आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला अखेर 24 वर्षांनी मुहूर्त; चित्रपटासाठी समितीचे पुनर्गठन

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरी नरके, सदानंद मोरे, दत्ता भगत यांचा समावेश

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट निर्मितीला २४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर मुहूर्त लागण्याची चिन्हे आहेत. राज्यातील महाआघाडी सरकारने त्यासाठी नव्याने समिती नेमली असून या वेळी चित्रपट निर्मिती होईल, अशी आशा समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे.

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण व्हावा यासाठी १९९९ मध्ये विलासराव देशमुख सरकारने मंजुरी दिली. प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यावर चित्रपटाची जबाबदारी देण्यात आली. त्या वेळीही चित्रपट निर्मितीसाठी देखरेख समिती नेमली होती. त्यानंतर जवळपास १५ वर्षे महात्मा फुले यांच्या जीवनावर अभ्यास करण्यात आणि संहिता लिहिण्यातच गेली. चित्रपट काही पूर्ण झाला नाही. डिसेंबर २०१८ मध्ये फडणवीस सरकारने चित्रपट निर्मितीचा नव्याने निर्णय घेतला. त्यासाठी समिती नेमली. निवडणुकीच्या अगोदर चित्रपट तयार व्हावा म्हणून ई-निविदा काढली. चित्रपट निर्मितीसाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला गेल्याने कुणी पुढे आले नाही आणि हा विषय मागे पडला.

आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चित्रपट निर्मितीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी तिसऱ्यांदा समिती नेमली गेली आहे. तसा आदेश १२ मे राेजी शासनाने काढला आहे. या पुनर्गठित समितीत पंढरीनाथ सावंत (मुंबई), डॉ. अरुणा ढेरे (पुणे), सदानंद मोरे (पुणे), हरी नरके (पुणे), दत्ता भगत (नांदेड) या जाणकार, दिग्गज साहित्यिकांचा सदस्य, तर माहिती महासंचालक (अध्यक्ष), माहिती संचालक (सचिव) यांचा समावेश आहे.

ऑनलाइन बैठक घेऊन मार्गी लावणार
महात्मा फुले यांच्यावर १९५५ मध्ये प्र. के. अत्रे यांनी चित्रपट निर्माण केला होता. त्यानंतर गेल्या दोन सरकारमध्ये निर्णय झाले, पण राजकारणच झाले. आता चित्रपट लवकर व्हावा म्हणून प्रयत्न करणार आहे. सध्या लॉकडाऊन असला तरी ऑनलाइन बैठकीचा प्रयत्न आहे. सर्व बाबी तपासून चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्न करू. -हरी नरके, समिती सदस्य, लेखक, संशोधक

तेव्हा १० कोटींचा खर्च अपेक्षित होता
मागच्या सरकारने चित्रपट निर्मितीसंदर्भातील निर्णय घेतला तेव्हा जवळपास १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. आता या निर्णयाबाबत नेमका किती खर्च अपेक्षित आहे, निर्मिती कशी होणार याबाबत काहीही स्पष्टता नाही. यासंदर्भात प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहासातील तज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, नव्या समितीची बैठक झाल्यानंतरच याबाबत सर्वकाही ठरेल, माहिती होईल.

बातम्या आणखी आहेत...