आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमीपूजन समारंभ:वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाच्या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडो - पालकमंत्री भरणे

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाचा वापर सिद्धरामेश्वरांच्या यात्रेसाठी येणाऱ्या जगतगुरू महाराजांच्या निवासासाठी होणार आहे. या भवनातून केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना चांगली अभ्यासिका करावी. या माध्यमातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

कुंभार वेस येथील जयभवानी मैदानात वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाच्या भूमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, श्री श्री श्री 1008 जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य, श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, माजी महापौर महेश कोठे, धर्मराज काडादी, संतोष पवार, आनंद चंदनशिवे, सुधीर खरटमल आदींसह लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना भरणे म्हणाले, कन्नड भवनाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम व्हावेत. भवनाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही. जिल्हा नियोजन समितीतून एक कोटींचा निधी दिला जाईल. जनतेच्या पैशाचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर निधीची कमतरता नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सोलापूर शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी चार-चार दिवस वाट पाहावी लागत आहे, हे दुर्देव आहे. येत्या दीड वर्षात समांतर पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यामुळे सोलापूरकरांना रोज पाणी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

महात्मा बसवेश्वर महाराजांचेही स्मारक

मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे स्मारक नियोजित आहे. यासाठी 45 एकर जागा मंजूर झाली असून महात्मा बसवेश्वर महाराजांचे चांगल्या प्रकारचे स्मारक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही श्री. भरणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...