आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर:कोरोना, पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक अचारसंहितेचा कायदा दाखवताच आक्रोश मोर्चाची नमती भूमिका

पंढरपूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंदोलकामध्ये अनुभवींची वानवा दिसल्याने नियोजित पायी मोर्चा कारने झाला मार्गस्थ

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूर ते मंत्रालय (मुंबई) असा आक्रोश मोर्चा शनिवारी (7 नोव्हेंबर) प्रशासनाने हाणून पाडला. एक लाखाच्या संख्येने या मोर्चासाठी मराठा बांधव जमा होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आलेले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने संचारबंदी, जमावबंदीचा आदेश लावुन शहरात आणि पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवल्यामुळे या मोर्चात केवळ सुमारे दीडशे कार्यकर्ते सहभागी होवू शकले. मंत्रालयापर्यंत पायी दिंडीव्दारे जाणारा हा मोर्चा प्रशासनाने येथील एसटी स्थानकापासून पुढे पुण्यापर्यंत कारने रवाना केला. दरम्यान बाहेरगावाहून खास मोर्चासाठी येथे आलेले मराठा समाज बांधव आक्रोश मोर्चा आंदोलकांच्या नमत्या भूमिकेमुळे नाराज दिसले.

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाज आंदोलक शनिवारी श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घेवून अठरा दिवसांचा पायी प्रवास करीत मंत्रालय (मुंबई) येथे पोहोचणार होते.

या मोर्चासाठी एक लाखांहून अधिक मराठा समाज बांधव येथे जमणार असल्याचे पत्रकार परिषदेत आयोजकानी सांगितले होते. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. त्यादृष्टीनेच मागील दोन दिवसांपासून पंढरपूरातून बाहेर गावी जाणारी तसेच बाहेरगावांहून पंढरपूराकडे येणारी एसटी वाहतूक पुर्णपणे बंद केलेली होती. शहरातील विठ्ठल मंदिर तसेच आसपासच्या परिसरात शुक्रवारी (6 नोव्हेंबर) रात्री बारा वाजल्या पासून एक दिवसाची संचारबंदी लावली होती. संचारबंदी लावून शहरात दोन पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केलेला होता. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिसांनी मोर्चासाठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांना रोखले होते. त्यामुळे सुमारे शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांचीच आक्रोश मोर्चासाठी उपस्थिती दिसली. मोर्चाच्या आयोजकांना देखील पोलिसांनी शुक्रवारी नोटीसा बजावल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून कायद्याची कडक अंमलबजावणी ठेवल्याने तसेच आयोजकांमध्ये कोणी जाणकार नसल्याने स्थानिक मराठा बांधवांनीही मोर्चाकडे पाठ फिरवली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पुणे पदवीधर मतदार संघातील निवडणूकीच्या आचारसंहितेचे भांडवल करीत प्रसंगी काहीशी लवकचीक भूमिक घेत प्रशासनाने हा मोर्चा पध्दतशीर गुंडाळला. विशेष म्हणजे मागील क्रांती मोर्चामध्ये सक्रीय असलेल्या शहरातील बऱ्याचशा मातब्बर मराठा समाज बांधवांनी विशेषत : महिला व युवतींनी आजच्या आक्रोश मोर्चाकडे पाठ फिरविल्याचेच दिसून आले.

दरम्यान मोर्चाच्या वेळी शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. शुक्रवारी रात्री बारा वाजल्या पासून शहरात पोलिसांची मोठी गस्त दिसत होती. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावरुन वाहनांची तपासणी करुनच वाहनांना पुढे पंढरपूरकडे जाण्यास पोलिसांकडून प्रवेश दिला जात होता. शहराला अक्षरश: पोलिसी छावणीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसत होते.

पदाधिकाऱ्यांनी घेतले नामदेव पायरीचे दर्शन

शहरात जमावबंदी तसेच विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी असताना देखील प्रशासनाने काहीशी नमती भूमिका घेत मोर्चेकऱ्यांची नामदेव पायरीचे दर्शन घेण्याची मागणी पुर्ण केली. आक्रोश मोर्चाच्या आयोजकांमधील वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांना नामदेव पायरीच्या दर्शनासाठी चौफाळ्यातून विठ्ठल मंदिराकडे सोडण्यात आले. या पदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेवून विठुरायाला केंद्र आणि राज्य शासनाला आरक्षण प्रश्नाकडे लक्ष देण्या विषयी साकडे घातले. या वेळी पदाधिकाऱ्यांकडून सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

गाड्यांमधून पदाधिकाऱ्यांना केले पुण्याकडे रवाना

दरम्यान अठरा दिवसांचा पायी मोर्चा काढण्याचे नियोजन असताना प्रशासनाने कोरोना तसेच पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक अंचारसंहितेचे कारण पुढे करीत मुख्यमंत्री आपणाला भेटु शकणार नाहीत. जरी भेटले तरी ते आपणाला आश्वासन देवु शकणार नाहीत. त्यामुळे मुख्य सचिवांना आपण मागण्याचे निवेदन द्यावे अशी मोर्चाच्या आयोजकांची समजुत घालून येथील एसटीस्थानका पर्यंत हा पायी मोर्चा काढण्यात आला. येथील बसस्थानका पासून खासगी गाड्यांमध्ये पदाधिकाऱ्यांना बसवुन पोलिस बंदोबस्तात त्यांना पुण्याकडे पोलिसांनी मार्गस्थ केले.

आम्ही पायीच जाणार : बाहेरगावच्या मराठा बांधवाची भूमिका

आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी पोलिसांचे कडे भेदून काही मराठा समाज बांधव गनिमीकाव्याने येथे दाखल झालेले होते. मात्र आक्रोश मोर्चाच्या आयोजकांनी प्रशासनापुढे घेतलेल्या नमत्या भूमिकेमुळे हे मराठा बांधव नाराज झाले. तुम्ही जरी गाडीतून गेला असला तरी आपण पायी जाणार असल्याची या नाराज बांधवांनी भूमिका घेतली. अखेर समाजाचा प्रश्न असल्याने आपण कठोर भूमिका घेऊ नये असे म्हणत येथील काही स्थानिक मराठा बांधव त्यांची मोर्चा नंतर समजुत घालीत होते. पण बाहेरगावांहून आलेले येथे कट्टर समाज बांधव पायी जाण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी पायी चालणे देखील सुरु केले मात्र येथील डीव्हीपी मार्ट जवळ पोलिस प्रशासनाने अखेर या बांधवांना देखील ताब्यात घेतले.

नियोजनाचा अभाव

आक्रोश मोर्चाच्या प्रमुख आयोजकांमध्ये एकही अनुभवी पदाधिकारी दिसला नाही. त्यामुळे मोर्चाच्या आयोजनामध्ये बऱ्याच त्रुटी दिसून आल्या. पदाधिकाऱ्यांमध्येदेखील गटतटाचे राजकारण दिसत होते. नामदेव पायरीचे दर्शन घेतानादेखील कोणाला सोडले जावे या बाबत प्रशासनाकडून नावे मागण्यात आली होती. त्या वेळी देखील पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...