आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:पंढरपुरात मराठा ‘आक्रोश मोर्चा’, मुंबईत दणदणीत मशाल मोर्चा, नामदेव पायरीजवळ आंदोलकांच्या सरकारविरोधी घोषणा

पंढरपूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूर ते मंत्रालय (मंुबई ) असा ‘आक्रोश मोर्चा’ शनिवारी निघणार होता, मात्र तो प्रशासनाने कोरोना व पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक आचारसंहितेचा कायदा दाखवून थोपवून धरला. संचारबंदी, जमावबंदी, एसटी बस बंदी आणि तगड्या पोलिस बंदोबस्तामुळे या मोर्चासाठी कार्यकर्त्यांची उपस्थिती कमी होती . १८ दिवस पायी दिंडीने मंत्रालयापर्यंत जाणारा हा मोर्चा प्रशासनाने येथील एसटी स्थानकापासून ते पुण्यापर्यंत कारने मार्गस्थ केला.

पंढरपूरला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. प्रशासनाकडून पूरेपूर दक्षता घेण्यात आली होती. दोन दिवसांपासून पंढरपुरातून जाणारी आणि येणारी बस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. विठ्ठल मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री बारापासून एक दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली होती. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी मोर्चासाठी येणाऱ्यांना रोखले. मोर्चाच्या आयोजकांना पोलिसांनी शुक्रवारी नोटिसा बाजावल्या होत्या. दरम्यान, सायंकाळी पुणे येथे मोर्चेकऱ्यांनी मुख्य सचिवांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

नामदेव पायरीजवळ आंदोलकांच्या सरकारविरोधी घोषणा
जमावबंदी व विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी असताना प्रशासनाने काहीशी नमती भूमिका घेऊन मोर्चेकऱ्यांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्याची मुभा दिली. आयोजकांमधील वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांना नामदेव पायरीच्या दर्शनासाठी चौफाळ्यातून विठ्ठल मंदिराकडे सोडण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरीचे दर्शन घेत केंद्र आणि राज्य शासनाला आरक्षण प्रश्नाकडे लक्ष देण्याविषयी विठुरायाला साकडे घातले. या वेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या.

वांद्रे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा मशाल मोर्चा धडकला
शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रात्री मराठा आरक्षणासाठी मंुबईत आंदोलन करण्यात आले. शनिवारी रात्री वांद्रे येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या दिशेने मशाल मोर्चा निघाला होता. मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने हा मोर्चा वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची मागणी आंदोलक करत होते. या वेळी पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मोर्चेकऱ्यांची समजूत घातली.

वाहनांमधून पदाधिकारी पुण्याकडे रवाना
अठरा दिवसांचा पायी मोर्चा काढण्याचे नियोजन होते, मात्र कोरोना तसेच पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री आपणाला भेटू शकणार नाहीत. भेटले तरी ते आपणाला आश्वासन देऊ शकणार नाहीत. त्यामुळे मुख्य सचिवांना आपण मागण्यांचे निवेदन द्यावे, असे प्रशासनाने सांगितले. प्रशासनाने मोर्चाच्या आयोजकांची समजूत घातली.

बातम्या आणखी आहेत...