आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर:महाराष्ट्रातील मराठी मालिकाविश्व परराज्यात स्थलांतरित; गोवा, दमण, सिल्व्हासा, वाकानेर येथे चित्रीकरण

सोलापूर(अश्विनी तडवळकर)23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुख म्हणजे काय असतं, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा मालिकांचा समावेश

प्रेक्षक दुरावू नये म्हणून महाराष्ट्रातील विविध निर्मिती संस्थांनी आपल्या मालिकांच्या चित्रीकरणाला मुंबईच्या बाहेर सिल्व्हासा, राजकोट गोवा दमण येथे सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईच्या मालिकाविश्वाला वेगवेगळे उत्तम पर्याय मिळाल्याच्या भावना कलावंत आणि निर्मात्यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र, सध्या हा एक चांगला पर्याय असला तरी भविष्यकाळात निर्मितीचा खर्च वाचावा किंवा कुठल्या नियमांची यादी नको या दृष्टिकोनातून कायमचा पर्याय म्हणून याकडे जर निर्मात्यांनी पाहिले तर मात्र मुंबापुरीच्या मालिकाविश्वाला ग्रहण लागण्याची शक्यता आहे.

सध्या ‘या फुलाला सुगंध मातीचा’ राजकोटच्या पुढे असणाऱ्या वाकानेर, सुख म्हणजे काय असतं, रंग माझा वेगळा, पाहिले न मी तुला या मालिकांचे गोव्यात, तर आई कुठे काय करते, सांग तू आहेस का? मुलगी झाली हो या मालिकांचे दीव दमण येथे सिल्व्हासा या भागात चित्रीकरण सुरू आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेचे दमणमध्ये चित्रीकरण सुरू आहे. तसेच काही हिंदी मालिकाही आता याच मार्गावर जाण्याची शक्यता आहे.

जेवणासह २४ तास डॉक्टर सेवेत : मालिकांचे संपूर्ण सेट कलावंतांसह स्थलांतरित झाले असून यात प्रत्येकी २५ ते ४० कलावंत व तंत्रज्ञ आहेत. जेवण-खाण्य, साहित्य व कलावंताच्या येण्या-जाण्याचा खर्च हा निर्मिती संस्थांनी केला असून एपिसोड बंद ठेवण्यापेक्षा कलावंतांना अधिकचा खर्च करून रसिकांचे मनोरंजन करणे महत्त्वाचे असल्याच्या भावना निर्मिती संस्थांनी केल्या. कलावंतांच्या आरोग्यासाठी २४ तास डॉक्टर सेवेत आहेत. रोज तपासणी मात्र बंधनकारक करण्यात आली आहे. विविध मराठी वाहिन्यांवर जवळपास ३० ते ४० मालिका सध्या सुरू आहेत.

निर्मितीचा खर्च अधिक
माझ्या मालिकांचे सध्या गोव्यात चित्रीकरण सुरू आहे. हा खर्च नेहमीपेक्षा दुप्पट आहे. कलावंतांनादेखील त्यांची हक्काची मेहनत मिळावी म्हणून हा वेगळा प्रयत्न आहे. या वर्षी त्यांना कामाचे समाधान व मानधन देणे गरजेचे आहे. - महेश कोठारे- निर्माता

काळजी घेऊन चित्रीकरण
आमच्या नेहमीच्या सेटची खूप आठवण येते. पण पर्याय नसल्याने आम्ही बाहेर राज्यात चित्रीकरण करत आहोत. आम्ही सर्वजण कोरोना नियमांच े याेग्य पालन करून चित्रीकरण करत आहोत. - समृद्धी केळकर, अभिनेत्री, या फुलाला सुगंध मातीचा

वाकानेरला चित्रीकरण सुरू
कोरोनामुळे मुंबईत रुग्णांची संख्या वाढल्याने बंदी आली आहे. त्यामुळे हे बदल केले आहेत. केवळ मनोरंजन थांबू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही वाकानेरला सध्या चित्रीकरण करत आहोत. - प्रशांत चौडप्पा, अभिनेते, या फुलाला सुगंध मातीचा

केवळ रसिकांच्या मनाेरंजनासाठी
सध्या महाराष्ट्रात चित्रीकरणाला निर्बंध आहेत. त्यामुळे आम्ही हा बदल केला आहे. आम्ही गोव्यात सध्या चित्रीकरण करत आहोत. रसिकांसाठी हे केले असून रसिक हे स्वीकारतील अशी आशा आहे. - मंदार जाधव, अभिनेता, सुख म्हणजे काय असतं

बातम्या आणखी आहेत...