आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडवा:खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी बाजारपेठ सज्ज, सोन्याचे दागिने, नवीन घर; वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू्ंच्या खरेदीस प्रतिसाद

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडवा

खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी बाजारपेठ सज्ज, सोन्याचे दागिने, नवीन घर; वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू्ंच्या खरेदीस प्रतिसाद

बहुतांश सराफ पेढ्या ग्राहकांनी गजबजल्या
सोलापूर | गेल्या १० वर्षांत सोन्याच्या दरात तब्बल २५ हजार रुपयांची वाढ झाली. गुंतवणूक म्हणून सोने घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला. त्यामुळे दराचा आलेख सातत्याने उंचावल्याचे दिसून येईल. २०११ मध्ये सोन्याचा दर २६ हजार ४०० रुपये तोळा (१० ग्रॅम, २४ कॅरेट) होता. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आजच्या घडीला त्याचा दर ५२ हजार रुपये आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्या पार्श्वभूमीवर पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजाराला सुवर्ण झळाली आली. त्याचे मुख्य कारण म्हणजे गुढीपाडव्यापासून निर्बंधमुक्त वातावरण असणार आहे. गेल्या दोन वर्षांतील गुढीपाडवा कोविडच्या निर्बंधांतच गेला. बाजारपेठाच बंद होत्या. व्यापारच थंडावला होता. याच कालावधीत सोन्याच्या दरात वाढही सुरू होती. २०२० च्या लॉकडाऊनमध्ये बाजारपेठा बंद असतानाही सोन्याचा दर ५६ हजार रुपयांपर्यंत गेलेला होता. दुसरी लाट ओसरल्यानंतर व्यापारपेठा सुरू झाल्या. त्यानंतर दरात घसरण सुरू झाली. ४ हजार रुपयांपर्यंत कमी होऊन स्थिरावली. या पार्श्वभूमीवर यंदाचा गुढीपाडवा आलेला आहे.

४०० कार, १५०० दुचाकींची नोंदणी
सोलापूर | दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा व्यावसायिक वाहनांच्या खरेदीस चांगला प्रतिसाद असल्याची माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली.

नव्या खरेदीसाठी पाडवा उत्तम असल्याने वाहन खरेदीसाठी सोलापूरकर उत्सुक आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे मागणी कमी होती. मात्र यावर्षीचा पाडवा उत्साहाचे, खरेदीचे वातावरण दिसते आहे. चारचाकी व दुचाकी वाहन खरेदीची मागणी यंदा चांगलीच वाढली आहे. होंडा कार व किया कारचे डिस्ट्रीब्युटर असणारे नितीन बिज्जरगी म्हणाले, यंदा ब्रँडेड कारची मागणी पाडव्यानिमित्त चांगलीच वाढली. सोलापूरमध्ये हायवेचे जाळे वाढले आहे. गत दहा वर्षांत वाहन खरेदीची उलाढाल तिप्पटीहून जास्ती आहे. मागील दोन वर्षांचा कोरोना काळ वगळला तर यंदाचा पाडवा खरेदीसाठी उत्साही बनला आहे. साहजिकच सोलापूरकरांनी होंडा व कियाच्या १०२ हून जास्ती कार पाडव्यानिमित्त खरेदी केल्या आहेत. त्याची डिलिव्हरी देत आहोत. दुचाकीमध्येही चांगलीच मागणी असल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले.

ग्राहकांच्या हाती मुहूर्तावर वाहनांच्या किल्ल्या देण्यासाठी विक्रेत्यांचा प्रयत्न
ग्राहकांकडून वाहनांची मागणी वाढली असली तरी वाहनांची सप्लाई चेन अजूनही सुरळीत झालेली नाही. यामुळे पुरेशी वाहने उपलब्ध होत नाहीत. काही ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. सोलापुरात पाडव्यानिमित्त ४०० हून जास्त कार खरेदी होत आहे. १५०० हून जास्ती दुचाकी बुकिंग झाली आहे, यातील जास्तीत जास्त वाहनांची डिलिव्हरी उद्या देण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी लगबग
सोलापूर | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी होत असते. त्या पार्श्वभूमीवर आठवडाभरापासून इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत ग्राहकांची लगबग आणि उत्साह दिसून येत आहे.

गेल्या दहा वर्षांपूर्वी सोलापूरच्या इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल व्हायची. सध्या मात्र १० ते १२ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. दहा वर्षांपूर्वी साधारण सोलापूर शहरात ३० ते ४० इलेक्ट्रॉनिक्स दुकाने होती. आता शहर आणि जिल्हा मिळून सुमारे २५० दुकाने आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. ग्राहकांना पूर्वी मोजकेच प्रॉडक्ट पाहायला मिळत होते त्यामुळे चांगले आणि मोठे प्रोडक्ट बघण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये जावे लागत होते. आता मात्र प्रत्येक मोठं मोठ्या वस्तू सोलापुरात पाहायला मिळत आहेत. दर किती वाढले तरी वेगवेगळ्या सुविधांमुळे ग्राहकांचा ओढा मात्र या वस्तू खरेदी करण्याकडे आहे. त्यामुळे सोलापूरची उलाढाल कोट्यवधी रुपयांची झाली आहे. कोरोना पूर्वी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत जशी स्थिती होती, जशी उलाढाल होती त्यापेक्षाही चांगली उलाढाल यंदाच्या वर्षी होण्याची शक्यता आहे.

दर वाढले तरी प्रतिसाद चांगला
टीव्हीची जागा मोठ्या एलईडीने घेतली असून, १३ हजारांपासून १० लाखांपर्यंत किंमत आहे. एसीकडे कल वाढला असून त्याची किंमत २५ हजारपासून ७५ हजारपर्यंत आहे. फ्रीज ११ हजारांपासून ३ लाखापर्यंत, वॉशिंग मशीन ८ हजारपासून ८० हजारापर्यंत, मोबाइल ६ हजारांपासून दीड लाखापर्यंत दर आहेत. दर वाढले असले तरी या इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाले आहेत.

खरेदीचा उत्साह
सोन्याचा दर कितीही वाढला तरी मुहूर्तावरील खरेदीचा उत्साह अमाप असतो. गुंतवणूक म्हणून खरेदी करणारे वाढले. लग्नसराई डोळ्यासमोर ठेवूनही खरेदी होतच असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हॉलमार्क दागिने विकणे सक्तीचे झाले. त्याने ग्राहकाच्या हाती शुद्ध सोने मिळते.’’ सुरेश बिटला, सराफ व्यापारी

बातम्या आणखी आहेत...