आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कासारवाडी येथील जवान विठ्ठल रामा खांडेकर (वय ४०) यांना काश्मिर येथे सेवा बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले. कासारवाडी ता.बार्शी येथे जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत शासकीय इतमामात पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ओमकार या अवघ्या आठ वर्षाच्या चिमुरड्याने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी अमर रहे, अमर रहे..शहीद जवान विठ्ठल खांडेकर अमर रहे, वीर जवान तुझे सलाम या घोषणांनी परिसर दुमदुमला. आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. केंद्रीय राखीव पोलिस दलात असलेले खांडेकर सध्या काश्मिरमधील पुलवामा येथील छावणीमध्ये कार्यरत होते. त्यांना सकाळी हदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या वीर मरणाचे वृत्त गावी येताच परिसरात शोककळा पसरली.
शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत त्यांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी आ. राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने, भाऊसाहेब आंधळकर, सरपंच नितीन मंडलिक, उपसरपंच सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते. सेवेचे १६ महिनेच शिल्लक असतानाच त्यांना वीरमरण आले. शहीद विठ्ठल खांडेकर यांच्या मागे वडील रामभाऊ, पत्नी सोनाली, मुलगा ओमकार, मुलगी स्नेहल, भाऊ सयाजी,भावजय, ४ बहिणी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.