आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि दररोज येणाऱ्या भाविकांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा अपुरी ठरत आहे. परिणामी दररोज लाखो लिटर्स सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट चंद्रभागा नदीत जाऊन मिसळते आहे. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रत्येकी ५ एमएलडी क्षमतेचे २ नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र मागील ३ महिन्यांंपासून हा प्रस्ताव नगरपालिकेतच पडून आहे. निवडणूक झाल्यानंतरच पालिकेच्या लोकनियुक्त कार्यकारणीकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. पंढरपूर शहराची २०११ सालची लोकसंख्या ९९ हजार होती.
उपनगरी भागांची लोकसंख्या सुमारे १० हजारांहून अधिक होती. शिवाय त्यावेळच्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन नगरपालिकेने १५.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प २०११ साली गोपाळपुरात उभा केला. पहिल्या दोन टप्प्यातील भूमिगत गटार योजनेतील सांडपाणी त्या प्रकल्पात नेऊन त्यावर प्रक्रिया करून ते नदीला सोडण्यात येत आहे. आता १० वर्षांनंतर शहरासह उपनगरांची एकूण लोकसंख्या १ लाख २५ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. शिवाय दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या ४० हजारांपर्यंत वाढली आहे.
पालिकेवर प्रशासक असल्यामुळे प्रस्ताव रखडला
सध्या शहरात दररोज १३ ते १४ एमएलडी सांडपाणी वापरून सोडले जाते. शनिवार, रविवारी, एकादशीच्या दिवशी हेच सांडपाणी १६ ते १८ एमएलडीपर्यंत वाढते. अशा वेळी हे सांडपाणी प्रक्रिया न करताच पुष्पावती नदी (गोपाळपूर) आणि मलपे ओढा (इसबावी) येथून थेट चंद्रभागा नदीला जाऊन मिळते. या सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी आता नगरपालिकेने चौथ्या टप्प्यातील जुन्या पाइप लाइन बदलणे, ३ ठिकाणी पंप हाऊस उभा करणे, आणि मलपे ओढा (इसबावी), माळी वस्ती (ल. टाकळी) अशा २ ठिकाणी स्वतंत्र प्रत्येकी ५ एमएलडी पाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला आहे. चौथ्या टप्प्यातील हा प्रस्ताव ७७ कोटी रुपयांचा आहे. मात्र ३ महिन्यांपासून हा प्रस्ताव नगरपालिकेतच पडून आहे, या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी लोकनियुक्त कार्यकारिणी अस्तित्वात नाही. सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने नवीन प्रस्तावाचे काम जागच्या जागी ठप्प आहे.
तिसऱ्या टप्प्यात २.५ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित
तिसऱ्या टप्प्यातील भूमिगत गटार योजना प्रकल्पात चंद्रभागा नदीत जाणारे संपूर्ण सांडपाणी बंद करण्यात आले. शिवाय नदीपलीकडे असलेल्या ६५ एकर येथील यात्रा काळात येणाऱ्या भाविकांचे सांडपाणी, नदीपलीकडील मठ, मंदिरे आणि झोपडपट्टी येथील सांडपाणी यावर प्रक्रिया करणारा स्वतंत्र २.५ एमएलडी प्रक्रिया प्रकल्प सुरू झालेला आहे. त्यामुळे ६५ एकर, नदी पलीकडील झोपडपट्टी, माठातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात यश आले आहे.
नवीन प्रस्ताव अनिश्चित
नवा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे जाणार, त्याला मंजुरी मिळणार, नंतर निधीची तरतूद होऊन तो मिळणार आणि मग काम होणार, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास किती महिने,वर्षे लागतील हे सांगता येत नाही. तोवर सध्या दररोज लाखो लिटर्स सांडपाणी, मैलामिश्रित पाणी थेट चंद्रभागेत जाऊन मिसळते आहे. तूर्तास तरी पालिका प्रशासनाला धृतराष्ट्र बनून चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाकडे डोळेझाक करावी लागते.
४ थ्या टप्प्यातील प्रस्ताव तयार
पंढरपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया, जुनी पाइप लाइन बदलणे, पंपिंग स्टेशन्स अशा कामांचा समावेश असलेला ४ थ्या टप्प्यातील प्रस्ताव तयार आहे. मात्र सध्या नगरपालिकेत प्रशासक असल्याने हा प्रस्ताव वर पाठवण्यात आलेला नाही. नवीन बॉडी आल्यानंतर प्रस्ताव पाठवला जाईल व पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल''
आत्माराम जाधव, अभियंता, नगरपालिका पाणी पुरवठा, पंढरपूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.