आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला:कामं होत नसतील तर दंगा करा - मंत्री यशोमती ठाकूर; आपला धाक असला पाहिजे - बाळासाहेब थोरात

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासकीय कार्यालयात जाताना सोबत चार-पाच जणांना घेऊन जा, बाळासाहेब थोरात यांचा सल्ला

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर हे दोघेही शनिवारी सोलापुरात कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी आले होते. त्यापूर्वी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस कमिटीत घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला. 'कामं होतं नसतील तर दंगा करा' असा अजब सल्ला महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. तर शासकीय कार्यालयात जाताना सोबत चार-पाच जणांना घेऊन जाण्याचा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. यामध्येच एका कार्यकर्त्यांने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन गेल्यानंतर कामे होत नाहीत असे सांगितले. यावर उत्तर देताना मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, 'कामे होत नसतील तर दंगा करा. भीक मागितली तर कोणी देत नाही, अधिकार हिसकावून घ्यावे लागतात. कोणत्याही तालुका अध्यक्षाने पुन्हा अशी तक्रार करु नये. तुम्हाला तालुका अध्यक्ष केले आहे, तुमचा तालुका तुम्ही सांभाळला पाहिजे. त्याला ताकद देण्याचे काम आम्ही करु' असे वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील अशाच प्रकारचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

कार्यकर्त्यांच्या तक्रारीर ऐकल्यानंतर बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'आम्ही इतके जिल्हे फिरलो, मात्र अशी तक्रार पहिल्यांदा ऐकली, आपले लोक तिथल्या तिथे बंदोबस्त करतात. त्यामुळे आपले कुठतरी चुकतंय हे लक्षात घ्या. आपला धाक असला पाहिजे. धाक निर्माण करण्याची गरज जनतेची, कार्यकर्त्याची असली पाहिजे. चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपला धाक असला पाहिजे. आपण कार्यकर्ते म्हणून जाताना जरा एकजुटीने गेले पाहिजे, दोन-चार पोरं या बाजूला, दोन-चार पोरं दुसऱ्या बाजूला घेऊन गेलं की सगळं व्यवस्थित चालतं' असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

कोरोना विषयक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत थोरात आणि यशोमती ठाकूर यांना त्यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, कामासाठी पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर नैतिक धाक असला पाहिजे. या अर्थाने आपण हे विधान केल्याचे स्पष्टीकरण महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...