आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्ती:एकादशीच्या दिवशी 1 लाखाहून अधिक भाविकांचे विठ्ठल दर्शन ; यंदा भाविकांची संख्या कमी झाली

पंढरपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावल्यानंतरही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केलेल्या चांगल्या नियोजनामुळे भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळाले आहे. एकादशीच्या दिवशी पहाटे मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन अशा दोन मार्गाने तब्बल १ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन झाले आहे. दरम्यान, यंदा भाविकांची संख्या रोडावली असली तरीही मंदिर समितीच्या उत्पन्नात मात्र १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

वर्षातील चार प्रमुख यात्रांपैकी एक असलेली कार्तिकी यात्रा ४ नोव्हेंबर रोजी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या २५ ते ३० टक्के कमी झाली होती. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर फारसा ताण आला नाही. दर्शन आणि चंद्रभागा स्नान, नगर परिक्रमा आदी पारंपरिक उपक्रम सुलभरीत्या पार पडले. मुख्य एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा संपल्यानंतर श्री विठ्ठल दर्शन सुरू झाले.

मुख दर्शन रांगेतून ५५ हजार भाविकांनी घेतले दर्शन मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन अशा दोन्ही मार्गांनी दर्शन व्यवस्था असल्याने भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळाले. मुखदर्शन रांगेतून ५५ हजारांहून अधिक तर पदस्पर्श रांगेतून ४५ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले. शनिवारी द्वादशीच्या दिवशी भाविकांची गर्दी झपाट्याने ओसरली. त्यामुळे दुपारपासून पत्राशेडमधील दर्शन रांग संपली होती.

मंदिर समितीच्या उत्पन्नात १५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित यंदा भाविकांच्या संख्येत २५ ते ३० टक्के घट झाल्याचे दिसत असले तरीही मंदिर समितीच्या देणगीत मात्र वाढ झाल्याचे प्राथमिक अंदाजावरून दिसते आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीच्या उत्पन्नात १५ टक्क्यांहून अधिकची वाढ होईल, असा अंदाज समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाची कार्तिकी यात्रा मंदिर समितीसाठी फलदायी ठरणार असल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...