आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गणना झालेल्या 1 लाख झाडांमध्ये सर्वाधिक सुबाभूळ ; शहरात स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागवडीसाठी हवाय पुढाकार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सोलापूर महापालिकेने पहिल्यांदाच एप्रिल महिन्यांपासून वृक्षगणना सुरू केली आहे. शहरातील गावठाण परिसरासह, सिद्धेश्वर मंदिर, उद्यान व शासकीय कार्यालयांसह, काही खासगी परिसरातील एक लाख झाडांची गणना आतापर्यंत पूर्ण झाली. त्यामध्ये १८ टक्क्यांपेक्षाही जास्त सुबाभूळ आहे. स्थानिक प्रजातींच्या तुलनेत परदेशी झाडांची संख्या नेमकी किती? हे गणना झाल्यानंतर समोर येणार आहे. महापालिका, नगरपालिकांमध्ये वृक्ष प्राधिकरण असणे कायद्यान्वये आवश्यक आहे. पण सोलापूर महापालिकेत प्रत्यक्षात कागदोपत्रीच प्राधिकरण होते. तसेच, शहरामध्ये किती वृक्ष आहेत, यासंदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. वृक्ष प्राधिकरण समिती नियुक्तीबाबत पर्यावरणप्रेमींनी पाठपुरावा केला. एप्रिल २०२२ पासून शहरातील वृक्षांची गणना करण्यासाठी मुंबईतील सारा आयटी प्रायव्हेट लिमिटेड संस्थेची नियुक्ती झाली. पुढील दहा महिन्यांमध्ये ती संस्था शहरातील सर्व वृक्षांची गणना करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करेल. दरम्यान, त्या पथकाने दोन महिन्यांमध्ये शहरातील गावठाण भाग, उद्यान, शासकीय कार्यालय परिसरातील एक लाख झाडांची गणना केली. त्यामध्ये सुबाभूळचे प्रमाण अधिक आढळले. स्थानिक प्रजातींची रोपे लावण्याऐवजी कमी कालावधीत झपाट्याने वाढणाऱ्या पररदेशी प्रजातींची रोपे लावण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. वनविभागही त्यास अपवाद नाही. शहरातील रस्ते दुभाजक, काही मध्यवर्ती ठिकाणी स्थानिक प्रशासनसह, स्वयंसेवी संस्थांनी परदेशी झाडे लावली आहेत. शोभिवंत झाडी, झुडपे पर्यावरणासाठी किती फायदेशीर? याचे चिंतन होण्याची गरज आहे.

सुबाभूळ काढून तिथे स्थानिक प्रजातीची झाडे लावावीत : परदेशी वृक्षांची संख्या वाढल्याने स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. ऐन उन्हाळ्यात परदेशी झाडांची पानगळ होते. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात सूर्यांची प्रखर किरणे थेट जमिनीवर पडतात. परिणामी पृष्ठभागागावरील तापमानात वाढ होते, असा एक मतप्रवाह पर्यावरण अभ्यासकांतून होतोय. या संदर्भात मंगळवेढा वनस्पती शास्त्राचे अभ्यास रामेश्वर फुगारे यांना विचारले असता, तापमानवाढीला परदेशी झाडांना जबाबदार धरणे योग्य नाही. पण, परदेशी झाड लावण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. त्या ऐवजी स्थानिक प्रजातींची झाडे लावल्यास पर्यावरणासह पक्षी-प्राण्यांना त्याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. सुबाळ काढून त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींची झाडं लावावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दोन वर्षांत स्थानिक प्रजातीची ५० हजार झाडे ^शहरातील एक लाख झाडांची गणना झाली असून, त्यामध्ये सुबाभूळचे प्रमाण अधिक आढळले आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत दोन वर्षांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त प्रामुख्याने स्थानिक प्रजातींची झाडे लावली आहेत. शहरातील पर्यावरण प्रेमींमध्ये स्थानिक प्रजातींच्या रोपांबाबत सतर्कता वाढली आहे. वृक्षगणना पूर्ण झाल्यानंतर स्थानिक व परदेशी झाडांची नेमकी आकडेवारी समोर येईल.'' स्वप्नील सोलनकर, पर्यावरण अधिकारी, महापालिका

बातम्या आणखी आहेत...