आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील खासगी दवाखान्यांमध्ये बालकांना उपचारासाठी घेऊन आलेल्या पालकांची गर्दी वाढत आहे. तपासणीत दहापैकी आठ मुलांना सर्दी, खोकला, ताप, डोळे येणे, अंगदुखी आदी लक्षणे आढळून येत आहेत. यात गोवर, फ्ल्यू, राहेनो, अॅडिनो व्हायरसची लागण असू शकते. मात्र उपचाराअंती सर्वजण बरे होत आहेत. पालकांनी उपचार व योग्य खबरदारी घेतल्यास विषाणूपासून बचाव होण्यास मदत होते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
अॅडिनो, इन्फ्लुएंझा, राहेनोसारख्या विषाणूंमुळे मुलांना आजार वेदनादायी ठरत आहे. पाच वर्षांची बालके जास्त बाधित आहेत. लसीकरण झालेल्यांना विषाणापासून कमी त्रास होताना दिसत आहे. सिव्हिल हाॅस्पिटलच्या आकडेवारीनुसार मागील दीड महिन्यात २४ बालकांना दाखल करून घेतले होते. त्यामध्ये गोवरची सात बालके दाखल होती.
संसर्ग टाळण्यासाठी डाॅक्टरांनी दिल्या टिप्स
थंड पाणी पिऊ नका. बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचे टाळाच. गर्दीत जाऊ नका. पूर्ण बाह्याचे कपडे घालणे अधिक चांगले. हात स्वच्छ धुवत राहाणे गरजेचे आहे. आजारी बाळाला इतरांपासून दूर ठेवा. उच्च प्रथिनेयुक्त पौष्टिक आहार घ्या. आहारात ताज्या फळांचा समावेश करा.लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना भेटा.
ही मुख्य लक्षणे आहेत
सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, लाल डोळे, अंगदुखी, अशक्तपणा, श्वास घ्यायला त्रास, आहार कमी होणे.
आजारी मुलांना शाळेत पाठवू नका, गर्दीपासून दूर राहा
संसर्गजन्य विषाणूमुळे बरीच बालके बाधित होत आहे. मात्र उपचाराअंती बरे देखील होतात. सध्या शाळांमध्ये स्नेहसंमेलने सुरु आहेत. तसेच पालकांबरोबर मुलं गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे आजार पसरत आहेत. बरीच मुलं दोन ते तीनवेळा आजार पडतात. ते वेगवेगळ्या विषाणूचा संपर्कात आल्यामुळे होत आहे. हे विषाणू फुफ्फुसांना संक्रमित करू शकतात. त्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो. कोरोना व्हायरसची जशी काळजी घेत होतो, त्याचप्रमाणे काळजी घ्यावी लागेल. जी मुलं आजारी आहेत, त्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये.’’- डॉ. अतुल कुलकर्णी, बालरोगतज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.