आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघ गर्जना:मृगाची आजपासून सुरुवात, नक्षत्राच्या पावसाकडे अपेक्षित नजरा

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या वर्षी मान्सून वेळेत येणार, सरासरीपेक्षाही जास्त पाऊस होणार, असा अंदाज वर्तवला. शेतकऱ्यांची शेत-शिवाराची मशागत करून खरीप पेरणीसाठी लगबग सुरू झाली. पण प्रत्यक्षात १२ जूनपर्यंत लांबला असून, कर्नाटक, गोवामध्येच तो अडकल्याचा अंदाजही पुन्हा व्यक्त करण्यात आला. पण शेकडो वर्षांपासून भारतीय पंचांगशास्त्रातील पावसाची नक्षत्रे, त्याचे वाहन यावरूनच शेतकरी शेती-पिकांचे नियोजन करतात. पावसाळ्यातील नक्षत्र, त्यांचे वाहन, आगमन, त्यासंदर्भातील काही म्हणींबाबत शेतकऱ्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते.

मृगाचे वाहन गाढव : मृग नक्षत्रापासून प्रत्यक्षात पावसाळ्यास सुरुवात होते, असे मानले जाते. बुधवारी (दि. ८) दुपारी साडेबारा वाजता मृग नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. २२ जून रोजी बुधवारी सकाळी पावणेबारा वाजता आर्द्रा नक्षत्र लागेल. या नक्षत्राचे वाहन मेंढा असून, फक्त शनी ग्रह अमृत नाडीत आहे. पाऊस समाधानकारक होईल. मात्र किनारपट्टीवर पावसामुळे पूरसदृश स्थिती संभवते. ‘पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा..., अशी म्हण प्रचलित आहे. या नक्षत्राचा पाऊस जोरदार पडत असल्याने घरांच्या भिंती, माळवद, तटबंदी ढासळू शकतात, असे वर्णन त्या म्हणींमध्ये आहे.

६ जुलैला पुनर्वसू : ६ जुलैला ११ वाजून ११ मिनिटांना पुनर्वसू नक्षत्र सुरू होणार आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. नक्षत्रामध्ये मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा विभागात मोठे पाऊस होतील. काही ठिकाणी पूर येतील. ६, ७, ८, १३, १७ जुलैला पावसाची शक्यता आहे.

पुष्य नक्षत्र २० जुलैला : पुष्य नक्षत्र २० जुलै रोजी सकाळी पावणे अकरा वाजता सुरू होईल. कोल्हा हे नक्षत्राचे वाहन आहे. यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी हा पाऊस खूप पोषक असतो. ‘पडतील पुक(पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख’ अशी म्हण आहे. या नक्षात्राचा पावसामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबल्यास, चाकरीचा गडी मशागतीची कामे करता येत नाही, म्हणजे त्यासा आराम (सुख) मिळू शकते, असे म्हटले जाते.

"आश्लेषा' ३ ऑगस्टला : आश्लेषा नक्षत्र तीन ऑगस्टला सकाळी साडेनऊ दरम्यान सुरू होईल. पर्जन्यसूचक मोर हे नक्षत्राचे वाहन आहे. या नक्षत्राचा पाऊस बेभरवशाचा असतो. हा सूर ताल लावून पडत नाही, आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी, या नक्षत्राच्या पावसाची रीत असते.

"मघा’च्या घोडदौडीकडे नजरा : १७ ऑगस्टला सकाळी साडेसात दरम्यान मघा नक्षत्राची सुरुवात होईल. घोडा हे नक्षत्राचे वाहन आहे. या नक्षत्राचा पाऊस कामी भागात बऱ्यापैकी होईल. तर काही ठिकाणी कमी पडण्याची शक्यता आहे. या पावसाची संततधार असते. त्यासोबत थंडीही असते. मघाची घोडदौड रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरू शकते.

‘पूर्वा’ तुडुंब भरेल ओढे, नाले : पूर्वा नक्षत्राची सुरुवात ३० ऑगस्टला मध्यरात्री सव्वातीन वाजता होईल. मेंढा हे नक्षत्राचे वाहन आहे. रब्बी पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक असतो. या नक्षत्राच्या पावसामुळे शिवारातील ओढे, विहिरी तुडुंब भरू शकतात. उत्तरा नक्षत्राची सुरुवात १३ सप्टेंबरपासून सुरू होतीय. बेभरवशाचा पाऊस, अशी नक्षत्राची ओळख. पण या नक्षत्रामध्ये रब्बी पेरण्यांना वेग आलेला असतो. प्रामुख्याने ज्वारीची पेरणी नक्षत्रात होते. हस्त नक्षत्राची सुरुवात २७ सप्टेंबरला दुपारी पाऊण वाजल्यापासून होतीय. कोल्हा नक्षत्राचे वाहन आहे. या नक्षत्राचा पाऊस खूप मुसळधार पडतो. हत्तींना पाण्यात डुंबायला आवडत असल्याने या नक्षात्राच्या पावसामुळे आेढे, नद्या, तुडुंब भरतात. वर्षभराची पाण्याची चिंता यामुळे मिटते. चित्रा नक्षत्र १० ऑक्टोबरला मध्यरात्री पावणेदोन वाजता सुरू होईल. काही भागात वादळी पावसाचा योग आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान होईल. स्वाती नक्षत्राची सुरुवात २४ ऑक्टोबरपासून होईल. या नक्षत्राच्या पावसामुळे शेत-शिवारातील पिकांना उभारी मिळते.

यंदा समाधानकारक पाऊस
दोन एप्रिल रोजी शुभकृत संवत्सर सुुरू झाले. मान्सूनची सुरुवात चांगली दिसते. विशेषत: जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस समाधानकारक होईल. परंतु काही ठिकाणी हानीकारक असेल. पावसाळ्याच्या उत्तरार्धात मात्र पर्जन्यमान कमी राहील. मात्र एकंदरीत सरासरीइतका पाऊस होईल.''
ओंमकार दाते, पंचांगकर्ते, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...