आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी तलाव:जलपर्णी काढण्यासाठी मनपा पुन्हा खर्च करणार 30 लाख; मागील मक्तेदाराची मुदत संपली, आता नवीन मक्ता

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय जलसंवर्धन योजनेअंतर्गत विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलाव येथील कामासाठी आतापर्यंत २२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून तेथे विकासाची कामे करण्यात आली आहेत. मागील तीन वर्षांपासून जलपर्णी काढण्याचा मक्ता महापालिकेने दिला होता. मक्तेदाराने जलपर्णी काढली. त्यांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपली. जलपर्णी पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा नव्याने मक्ता काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे ३० ते ३५ लाख रुपये खर्च येणार आहे. तलावाचे संपूर्ण काम करण्यास वर्षासाठी मक्ता निश्चित करण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. केंद्र सरकारच्या जलसंवर्धन योजनेअंतर्गत संभाजी तलाव सुशोभीकरण करण्यात येत आहे. तेथे फूटपाथ, दिवाबत्ती, तलावात ड्रेनेजचे पाणी येऊ नये, यासाठी ड्रेनेजलाइन घालणे, गणपती विसर्जन कुंड, पाण्याचे फाउंटन उभे करण्यात आले. पाण्यातील जलपर्णी काही काळ कमी झाले असले तरी मागील महिन्यापासून पुन्हा जलपर्णी येत असून, ते काढण्यासाठी तेथे बोटिंग सुरू केलेल्या कंपनीने महापालिकेकडे वारंवार पत्र देत जलपर्णी काढण्याची सूचना केली.

या तीन ठिकाणाहून येते पाणी
जुळे सोलापुरातील वामननगरच्या समाेरची बाजू, प्रेमनगरच्या बाजूसह तीन ठिकाणांहून ड्रेनेजचे पाणी तलावात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलपर्णी वाढत असून, ते मैलामिश्रीत पाणी तलावात येऊ नये, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

पाच वर्षांसाठी असेल काम
संभाजी तलावात जलपर्णी काढण्यासाठी महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात येत असून, पुढील पाच वर्षांसाठी ३० लाखांचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

यापूर्वी ३७ लाख खर्च
यापूर्वी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने ३७ लाख रुपये खर्च केले आहेत. याशिवाय बोटिंगच्या सहाय्याने गाळ काढला. त्याची मुदत सप्टेंबर महिन्यात संपली.

नव्याने मक्ता काढणार
संभाजी तलावात जलपर्णी काढण्याच्या मक्त्याची मुदत संपली आहे. नव्याने मक्ता काढून तेथील जलपर्णी काढण्यासाठी टेंडर देण्याबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच प्रक्रिया करू.''-पी. शिवशंकर, पालिका आयुक्त

बातम्या आणखी आहेत...