आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीपाडवा:संगीतसंध्या, शोभायात्रेने नववर्षाचे स्वागत, संस्था व संघटनांतर्फेही विविध उपक्रम

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र शुद्ध प्रतिपदा- गुढीपाडवा शनिवारी शहर व परिसरात मोठ्या उत्साहात, आनंदाने साजरा झाला. मागील दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे गाठीभेटी घेता आल्या नव्हत्या. कमी झालेले महामारीचे प्रादुर्भाव, निर्बंध उठविण्यात आल्याने मध्यवर्ती बाजारपेठसह, शहरातील मार्ग लोकांची गर्दी होती. घरोघरी गुढी उभारण्यात आली. पंचांगाचे पूजन करण्यात आले.

नववर्षांच्या शुभेच्छा देत निघाली शोभायात्रा
हिंदू नववर्षं स्वागत समितीतर्फे भारतमाता पूजन अन् संगीत संध्येने हिंदू नववर्षाचे शनिवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. दिवसभरात हजारो हिंदू बांधवांनी या कार्यक्रमांत सहभाग घेतला. शनिवारी सकाळी शहराच्या सर्व भागांत चौकाचौकांत, मंदिरांमध्ये १२२ ठिकाणी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चौकांमध्ये भगवे ध्वज, फलक लावून चौक सुशोभित करण्यात आले होते. यानंतर सर्वांनी एकत्र येऊन भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम्, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय आदी घोषणा देण्यात आल्या.
तसेच शहरातील चौकाचौकांत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विकास नगर येथे त्या परिसरातील नागरिकांनी शोभायात्रा काढली. त्यामध्ये पारंपरिक वेशभूषा करीत महिला, युवती व बालक सहभागी झाले. चिदानंद मुस्तारे यांनी सूत्रसंचालन तर कोषाध्यक्ष नितीन करवा यांनी आभार मानले.

आरएसएसतर्फे १२२ ठिकाणी महाआरती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शहरातील पूर्व भाग, जुना व नवीन विडी घरकुल, भवानी पेठसह १२२ ठिकाणी महाआरती करण्यात आली. यात सुमारे १५ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. याच कार्यक्रमाअंतर्गत भाजप महिला आघाडीच्या वतीने पूर्व भागातील दत्त मंदिरात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भाजप महिला आघाडीच्या इंदिरा कुडक्याल, संघाचे रंगनाथ बंग, ज्ञानेश्वर म्याकल, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, विजया वड्डेपल्ली, बंकापुरे, पंेटप्पा गड्डम, प्रशांत फत्तेपूरकर, सावित्रा बल्लाटी, सरोजनी मुलोटी, नगरसेविका राधिका पोसा, अंबादास बिंगी आदी उपस्थित होते.

संगीतसंध्यास मोठा प्रतिसाद... शनिवार सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात आरोह प्रस्तुत संगीतसंध्या कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिवरत्न कोठारी यांच्या हस्ते झाले. यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ बंग, उत्सव अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, कोषाध्यक्ष नितीन करवा, ज्ञानेश्वर म्याकल, प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.यावेळी रमा कुलकर्णी, सौरभ दफ्तरदार व प्रसाद जिरांकलगीकर यांनी गीते सादर केली. त्यांना तबल्यावर नागेश भोसेकर, तालवाद्यावर रोहन वनगे, सिंथेसायझरवर निनाद सोलापूरकर तर संवादिनीवर मंदार गोडसे यांनी साथसंगत केली. संजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...