आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रमार्फत माय ई-केआरसी (My-e KRC) मोबाईल ॲपचे अनावरण सोमवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट वाचक विद्यार्थिनी, विद्यार्थी व शिक्षक पुरस्काराचेही थाटात वितरण झाले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रमार्फत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवी डॉ. राजेंद्र दास, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्रात असलेल्या उपलब्ध पुस्तके, ग्रंथ, कथा, कादंबरी, मासिके, जर्नल्स तसेच ई-बुक्स इत्यादी साहित्यकृतींची परिपूर्ण माहिती असलेल्या व विद्यार्थ्यांना उपयोगी असणाऱ्या माय ई-केआरसी (My-e KRC) मोबाईल ॲपचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. किशोर येले यांनी मोबाईल ॲप संदर्भात यावेळी माहिती दिली. याच कार्यक्रमात अमीर जहागीरदार, दुर्गा धावडे या विद्यार्थ्यांना तसेच डॉ. दत्ता घोलप या शिक्षकास उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बार्शी येथील शिक्षक जितेंद्र जळकोटे यांनी लिहिलेल्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
डॉ. राजेंद्र दास यांनी आपल्या व्याख्यानात डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी निर्माण केलेल्या वसतिगृह, शाळा, कॉलेज, रुग्णालय याची माहिती देत त्यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडून दाखविला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होण्याबरोबरच समृद्ध जीवन जगता येते, असे सांगत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवन प्रवासातून विद्यार्थ्यांना निश्चित प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. पल्लवी सावंत यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.