आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘नमामी गंगे’च्या धर्तीवर ‘नमामी चंद्रभागा’ची घाेषणा २०१५ मध्ये झाली. त्यानंतर दाेन सरकारे बदलली. पण एकही पैसा मिळालेला नाही. दुसरीकडे पुणे, पिंपरी-चिंचवड येथील मुळा-मुठा, पवना, इंद्रायणी या नद्यांच्या पुनरुज्जीवनाला मात्र शासनाच्या तिजाेरीतून पैसे बाहेर पडू लागले. भूवैकुंठी पंढरीतल्या वाळवंटात येणाऱ्या वारकऱ्यांच्या अस्मितेची चंद्रभागा दुर्लक्षित झाली. या विषयाची सरकारी अनास्था पाहता आता सरकारलाच कोपऱ्यापासून हात जोडत ‘नमामी सरकार’ म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नमामी चंद्रभागा’ची घाेषणा केली हाेती. त्यांच्याच मंत्रिमंडळातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प मार्गी लावण्याची गर्जना केली हाेती. त्याला ८ वर्षे उलटली. महाविकास आघाडी सरकारला घालवून ही मंडळी पुन्हा सत्तेवर आली. परंतु त्यांना ‘नमामी चंद्रभागा’चा विसर पडला आणि पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी पैसे वितरण सुरू केले. इतकेच काय, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे येथील अमरावती आणि भोगावती या नद्यांच्या संवर्धनालाही पैसे वितरित केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या चंद्रभागेकडे दुर्लक्ष केले.
काय आहे नमामी चंद्रभागा भीमा नदीच्या उगमापासून ते कर्नाटक सीमेवरील संगमापर्यंतच्या नद्या आणि उपनद्यांचे पुनरुज्जीवन, प्रदूषण रोखणाऱ्या उपाय योजना, नदीकाठच्या गावांमध्ये सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नदीकाठचे सुशोभीकरण आणि वनीकरण असा त्याचा आराखडा तयार करण्यात आला. त्याच्यावर २०१९ पर्यंत आढावा बैठका झाल्या. दरम्यान, विधानसभा निवडणूक झाली. महाविकास आघाडी सत्तेवर आली. कोरोना संसर्ग सुरू झाला आणि त्या सरकारने ‘नमामी चंद्रभागा’ गुंडाळून ठेवला.
तीन जिल्ह्यांनी मिळवले, साेलापूरनेच काय घोडे मारले? १ पुणे : मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी ९९० कोटींच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली. पैकी ८५ टक्के हिस्सा केंद्राचा आणि १५ टक्के हिस्सा महापालिकेचा आहे. केंद्राच्या हिश्श्यापैकी प्राप्त ६३ कोटी रुपये राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने पुणे महापालिकेच्या बँक खात्यात जमा केले.
२ पिंपरी-चिंचवड : पवना आणि इंद्रायणी या दोन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा खर्च २ हजार ७५७ कोटी रुपये अपेक्षित आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने अंदाजपत्रकीय रकमेस मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात २०० कोटींचे कर्जरोखे उभारण्यासाठी परवानगी मागितली. नगरविकास खात्याने दिली.
३ धुळे : दोंडाईचा-वरवाडेतील अमरावती आणि भोगावती या नद्यांच्या संवर्धनासाठी १० कोटी ९५ लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेनुसार ८ कोटी ७६ लाख रुपये नगर परिषदेला वितरित करण्यात आले.
४ सोलापूर : ‘नमामी चंद्रभागा’ प्रकल्प फक्त पंढरपूरपुरता करण्याचा सुधारित आराखडा तयार झाला. त्याचा प्रकल्प खर्च १८१ काेटी रुपये निश्चित करण्यात आला. परंतु अद्याप एक पैसाही या कामासाठी मिळालेला नाही. तिन्ही जिल्ह्यांनी राज्याच्या बजेटपूर्वीच निधी मिळवला. साेलापूरच्या पदरात धाेंडाच.
चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणूनच पितात, तितके शुद्धीकरण करा ^नमामी चंद्रभागेसंदर्भात शासनासमाेर काही मुद्दे मांडले. या पात्रातील पाणी वारकरी तीर्थ म्हणून पितात, तितके तरी शुद्धीकरण करा, अशी आग्रही मागणी केली. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील औद्याेगिक सांडपाणी भीमेत साेडले जाते. साखर कारखान्यांची मळी येते. त्याचा मार्ग थेट चंद्रभागेत आहे. आधी या गाेष्टी राेखल्या पाहिजेत. त्याशिवाय चंद्रभागेचे शुद्धीकरण शक्यच नाही. चंद्रभागा ही वारकऱ्यांची अस्मिता आहे. त्याचे काम तातडीने हाती घ्यावे.'' सुधाकर महाराज इंगळे, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.