आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापुरमधील अकलूजमध्ये नुकतेच एका तरुणाने जुळ्या बहिणींसोबत एकाच मांडवात लग्न केले होते. यावर आज लोकसभेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी टीका केली.
नवनीत राणा म्हणाल्या, एकाच मंडपात एकाचवेळी एका तरुणाचे दोन तरुणींसोबत लग्न होणे, हा हिंदू संस्कृतीवर डाग आहे. मुळात असे विवाह रोखण्यासाठी कलम 494, 495 आहेत. तरीही महाराष्ट्रात एका तरुणाने असे लग्न केले.
नियम, कायदे हवेत- नवनीत राणा
नवनीत राणा म्हणाल्या, सोलापुरातील या लग्नामुळे हिंदू संस्कृतीलाच धक्का लागत आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी नियम, कायदे करायला हवेत. तसेच, सोलापुरात असे लग्न करणाऱ्या तरुणालाही दंडित करायला हवे.
न्यायालयाकडून दिलासा
अकलूजमध्ये अतुल अवताडे या तरुणाने रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात 2 डिसेंबररोजी विवाह केला होता. त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर एकाने तरुणाविरोधात पोलिसांत तक्रारही केली होती.
मात्र, या प्रकरणात चौकशी करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. तक्रारदार हा कुटुंबातील सदस्य तसेच रक्ताच्या नात्यातील नाही, असे कारण न्यायालयाने दिले होते. अशा प्रकरणांत तक्रारदार हा संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असल्याशिवाय आरोपच होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. हाच मुद्दा नवनीत राणा यांनी आज संसदेत उपस्थित करून यावर तोडगा काढण्याची मागणी केली.
लग्नाला कुटुंबाची मान्यता
दरम्यान, या लग्नाला जुळ्या बहिणींच्या कुटुंबीयांची मान्यता होती, असे समोर आले आहे. याविषयी अकलूज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की, पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी अतुल या तरुणाशी सोलापुरात लग्न केले आहे. लहानपणापासून लग्न करुन एकाच घरी जायचे असे या बहिणींनी ठरवले होते. त्यांच्या कुटुंबानेही या विवाहाला मान्यता दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.