आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Needy Beneficiaries Will Be Deprived In The District Due To Closure Of Farms Useful Schemes; Highest 1986 Farms In Pandharpur Taluka |marathi News

34,555 प्रस्ताव रद्द:शेततळे उपयुक्त योजनाच बंद झाल्याने जिल्ह्यात गरजू लाभार्थी राहतील वंचित; सर्वाधिक 1986 शेततळी पंढरपूर तालुक्यात

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलकोष म्हणून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या मागेल त्याला शेततळे योजना महाविकास आघाडी शासनाने दीड वर्षापासून थांबवली आहे. उत्पादनामध्ये शाश्‍वतता आणणे, दुष्काळावर मात करणे, शेततळी उपयुक्त असल्याने भाजप-शिवसेना आघाडीच्या काळात शेततळे योजना राबवण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. पण अचानक योजना बंद केल्याने शेती सिंचनापासून जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित राहिलेत.

राज्यातील पर्जन्यावर अधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी १७ फेब्रुवारी २०१६ राेजी मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली. युतीच्या काळात ही योजना प्रभावी व लोकप्रिय ठरली होती. जिल्ह्यातील १२, ५२० शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. त्यामध्ये सर्वाधिक १९८६ शेततळी पंढरपूरमध्ये उभारण्यात आली. त्यासाठी ५७ कोटी ४७ लाख ६६ हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांना मिळाला. कोरोनाचा पहिला फटका म्हणून कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेला बसला. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे ४७ हजार २५ अर्ज आले होते. त्यापैकी २२ हजार ५८२ शेततळ्यांना मंजुरी दिली होती. १२, ५२० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली, योजना बंद करताना ३४,५५५ शेततळे रद्द करण्यात आली.

जिल्ह्यात वाढले सिंचन क्षेत्र
मागेल त्यास शेततळे योजनांमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसह भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन मिळाले. कृषी पंपाच्या भारनियमनामुळे रात्री-बेरात्री शेतामध्ये जाऊन पिकांना पाणी देण्याऐवजी बोर विहिरीतील पाणी अॅटोस्टार्टर सुरू करून पाणी थेट शेततळ्यामध्ये भरून दिवसभर ठिबक सिंचनाद्वारे पिकांना देण्याचा चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला होता. वीज नसल्याने पिकांना पाण्यासाठी खोळंबून राहण्यासाठी गरज भासली नाही. शेततळ्यातून सायपन पद्धत अथवा ठिबक सिंचनाद्वारे पिकांना पाणी देण्यात येते. सांगोला तालुक्यातील अजनाळे गावामध्ये सर्वाधिक शेततळी झाली. शेततळ्याचे गाव अशी नवीन आेळख त्या गावाची झाली आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेततळे योजना फायदेशीर ठरली.

जीपीएस सर्वेेक्षण करून व्हायचे अनुदान वाटप
मागेल त्यास शेततळे योजना अंतर्गत तलाव खोदाईसाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान कृषी विभागातर्फे देण्यात येते. तलाव खोदण्याचा आकार, झालेल्या कामानुसार मंडल कृषी अधिकारी तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पथकातर्फे तपासणी करून जीपीएस सर्व्हेक्षण करून अनुदान वाटप करण्यात येते. तलाव पूर्ण झाल्याचा अहवालानंतर त्यामधील अस्तरीकरण (ताडपत्री) खरेदीसाठी ७५ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येत होते. विहीर खोदण्यासाठी तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो. त्या तुलनेत एक ते दीड लाखामध्ये शेततळे उभारून सिंचनासाठी पर्यायी सोय होत, असल्याने शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद त्यास मिळत होता. प्रत्यक्षात तलाव खोदणे, ताडपत्री खरेदीसाठी पूर्ण अनुदान शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडले नाही. तेही मिळण्यासाठी सातत्याने कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये येरझाऱ्या घालण्याचा मनस्ताप अनेकांना झाला.

आता वैयक्तिक शेततळे उभारण्याची घोषणा
मागेल त्यास शेततळे योजनेचा जिल्ह्यातील १२ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला. त्या सर्व शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले आहे. शासनाने ती योजना बंद केली. महाविकास आघाडी सरकाराने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यास ७५ हजार रुपये अनुदान देण्याचा विचार प्रास्तावित आहे. प्रत्यक्षात ती योजना अद्याप सुरू झाली नाही.’’
बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...