आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दवाढची दुर्दशा:अंतिम ले-आऊटही नाही; प्लाॅट पाडून  रस्तेही विकले, नागरिक पुरते अडकले!

साेलापूर / चंद्रकांत मिराखाेर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या हद्दवाढ भागातील शेतजमिनी प्लाॅट पाडून विकताना विकासकाने महापालिकेकडून अंतिम ले-आऊट मंजूर करून घेतले नाहीत. विकास शुल्क भरत नाहीत. तो भरण्यासाठी अंतिम ले-आऊट मंजूर असावा लागतो. या अंतिम आराखड्यात नागरी सुविधांसाठी जागा साेडावी लागते. गल्लाभरू विकासकांना या कटकटी वाटतात. म्हणून नगरांना गाेंडस नावे देऊन प्लाॅट विकून माेकळे हाेतात. प्लाॅटधारक मात्र भलत्याच नागरी समस्यांच्या विळख्यात सापडतात.

हे दुष्टचक्र संपवण्यासाठी विकास शुल्क भरून घेतल्याशिवाय महापालिकेने अशी नगरे हस्तांतरित करून घेऊ नये, असा ठराव १८ वर्षांपूर्वी सभागृहात झाला. त्याकडेही अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेते. कारण तिथे नगरसेवकांचे मतांचे राजकारण असते. त्यामुळे महापालिकेच्या तिजाेरीतून नागरी सुविधांवर खर्च करावा लागताे. हा खर्च करताना अशा नगरांतील नियोजित रस्तेही सापडत नाहीत. कारण त्यावर घरांची बांधकामे झालेली आहेत. विजेच्या खांबांवरील तारा अतिशय धोकादायकरीत्या घरांच्या वरून गेलेल्या आहेत. काही ठिकाणी तर असे खांब थेट घरांना लागून आहेत. त्यातून अपघात झाला, तर जबाबदार काेण? या प्रश्नाचेही उत्तर नाही.

रचनेप्रमाणे जमिनीवर स्थिती नाही, सुविधांची बोंबाबोंब
प्राथमिक ले-आऊटमध्ये भुयारी गटारी दाखवतात, कच्चे रस्ते, पाण्याच्या टाक्यांसाठी जागा, आराेग्य सुविधा, बागा अथवा क्रीडांगणांसाठी आरक्षित जागा दाखवतात. प्रत्यक्ष प्लॉट पाडून आरक्षित क्षेत्राची विक्री केलेली असते.

अंतिम ले-आऊटमध्ये
नागरी सुविधांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या परंतु त्या विकसित झाल्या नाहीत. काही ठिकाणी तर अशा आरक्षित जागांवर अतिक्रमण झाले आहे. अगदी रस्तेही विकले गेल्याने त्यावर घरे उभी राहिली.

शहराच्या चारही दिशांना अशी अविकसित नगरे
शहराच्या चारही दिशांमध्ये अशी अविकसित नगरे दिसून येतील. सर्वाधिक नगरे पूर्वभागात आहेत. नीलम नगर, जुना विडी घरकुल, बाळे, देगाव, केगाव, हत्तूर आदी ठिकाणी गुंठेवारीचे प्लाॅट आहेत. त्यावर काही नगरे वसली. तेथील नागरिकांना इतका पश्चात्ताप हाेताे की, का बरे येथे आलाे? साधा रस्ता नाही, पाणी नाही, ड्रेनेज नाही, घंटागाडी नाही. मजरेवाडी, नई जिंदगी परिसर आणि त्यापलीकडे झालेल्या नगरांत अशीच स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...