आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:30 वर्षांत एकही गुन्हा नाही ; 100 लोकवस्तीचे गाव, 225 वर्षांत केवळ आठ गुन्हे

वैराग / राहुल दळवी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरोघरी मातीच्या चुली अशी म्हण आहे. प्रत्येक घरात भांडण-तंटे होत असतात, असा त्याचा सरळ अर्थ. जे घरात तेच गावात, त्यामुळे गावोगावी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र बार्शी तालुक्यातील चिंचखोपण गावात मागील ३० वर्षांत एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

गेल्या २२५ वर्षात केवळ आठ गुन्हे दाखल झाले आहेत. चिंचखोपणमध्ये २० कुटुंबात सुमारे १००-१२५ लोक गुण्यागोविंदाने राहतात. छोटेसे गाव असले तरी शिकवण मात्र मोठी देत आहे. आमच्या गावात लोक समाधानाने राहतात. एखाद-दुसरे किरकोळ भांडण झालेच तर गावातच मिटवले जाते. पोलिस ठाण्याला तक्रार जाऊ देत नाही, असे ग्रामस्थ उमेश जगताप यांनी सांगितले.

३० वर्षांपूर्वी किरकोळ गुन्हे वैराग पोलिस ठाण्याअंतर्गत चिंचखोपण हे ऐतिहासिक गाव येते. गावात मोडी लिपीत असलेल्या नोंदी आढळून येतात. गावात १९२० मध्ये पहिला चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १९४६ मध्ये दुसरा चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १९६४ मध्ये घरफोडीचा तर १९७३, १९७४, १९७५ व १९८० मध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १९९२ ला शेवटचा किरकोळ हाणामारीचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर सुमारे ३० वर्षांत एकही गुन्हा दाखल नाही.

ग्रामस्थांच्या समन्वयाचा आदर्श घ्यावा कायद्याबाबत असलेली जागरूकता आणि भांडणामुळे होणारे नुकसान गावकऱ्यांनी ओळखले. त्यामुळे गावातून गुन्हे दाखल झाले नाहीत. या गावात निर्माण झालेला समन्वयपणाचा आदर्श इतर गावांनीही घेणे गरजेचे आहे. विनय बहिर, पोलिस निरीक्षक, वैराग पोलिस ठाणे

तक्रारी गावातच मिटवतो चिंचखोपण गावात २० कुटुंब वास्तव्यास आहेत. गावात भांडणे होत नाहीत. किरकोळ तक्रारी गावातल्या गावातच आम्ही मिटवतो. पोलिस स्टेशनची पायरी चढली नाही. सुधाकर गीते, तंटामुक्त अध्यक्ष,चिंचखोपण, हातीज

बातम्या आणखी आहेत...