आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ली पुरस्कार प्रदान:ना. धों. महानोरांच्या काव्यावर प्रेम करणारा विदर्भातला साहित्यिक सोलापूरकर झाला; काव्यप्रतिभेचे सुशीलकुमार शिंदे यांनी केले कौतुक

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनील शिनखेडे यांनी महानोरांच्या कवितांवर प्रचंड प्रेम केले. निवृत्तीनंतर सोलापुरात स्थायिक झाले. त्यांच्या रूपाने विदर्भातला साहित्यिक सोलापूरला मिळाला, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले. कविवर्य डॉ. लक्ष्मीनारायण बाेल्ली स्मृती साहित्य पुरस्कार श्री. शिनखेडे यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा आणि चंडक परिवाराच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले होते. ११ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. श्री. शिनखेडे यांच्यासह पत्नी स्नेहा शिनखेडे यांनी तो स्वीकारला. शाखेचे अध्यक्ष डॉ. सुहास पुजारी, कार्याध्यक्ष अॅड. जे. जे. कुलकर्णी, कवी मारुती कटकधोंड, साहित्यप्रेमी दत्ता सुरवसे आणि किशोर चंडक मंचावर होते. हॉटेल सूर्यामध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

सोलापुरी साहित्य, संगीत, नाट्यक्षेत्राचा धांडोळा घेत सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘मी आंध्र प्रदेशचा राज्यपाल असताना कवी बोल्ली यांना तेलुगु विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांच्या नावाचा पुरस्कार विदर्भ साहित्य संघाशी जवळीक असणाऱ्या कवीला देण्याचे भाग्य मिळाले. शिनखेडे हे यशवंत मनोहर यांचे विद्यार्थी. कवी ग्रेस यांचा सहवास लाभलेले. नोकरीच्या निमित्ताने जळगाव, मुंबई करून सोलापूरला आले आणि सोलापूरकरच होऊन गेले. त्यांच्या शोधक वृत्तीने सोलापूर आकाशवाणीही समृद्ध झाली.’रजनीश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. श्री. कटकधोंड यांनी आभार मानले.

अमराठी चंडक परिवाराने केली मराठी साहित्याची सेवा, चालवली व्याख्यानमाला अमराठी चंडक परिवाराने मराठी साहित्याची सेवा केली. वडिलांच्या नावाने व्याख्यानमाला चालवली. त्याचे २५ वर्षांचे रेकॉर्डिंग ठेवले, अशा शब्दांत अॅड. जे. कुलकर्णी हे किशोर चंडक यांना उद्देशून बोलले. त्यांना उत्तर देताना श्री. चंडक म्हणाले, ‘राजस्थानातील मारवाड सोडून १०० वर्षे झाली. सोलापूरकरच झालो. आता आम्ही अमराठी कसे? ज्यांना ‘न’ अन् ‘ण’ चा उच्चारच करता येत नाही. तेच अमराठी. त्यांच्या या वाक्याला दाद देत श्री. शिंदे म्हणाले, ‘ डॉ. बोल्लींच्या पश्चात त्यांच्या स्मृतींची भेट देणाऱ्यांना कोण म्हणतंय अमराठी?’

बातम्या आणखी आहेत...