आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘नरहरी, श्यामराज महाराज की जय’... असा जयघोष करीत श्रीक्षेत्र नीरा नृसिंहपूर येथील लक्ष्मी नृसिंह मंदिरात शनिवारी (दि. १४) सायंकाळी नृसिंह जयंती उत्साहात साजरी झाली. हजारो भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर फुलून गेला. पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथे प्राचीन लक्ष्मी-नृसिंह मंदिर आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे दोन वर्षे भाविकांना जयंती उत्सव सोहळ्यात सहभाग घेता आला नव्हता. यंदाच्या वर्षी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिर समिती, पुजारी मंडळ व स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
नवरात्र उत्सव कालावधीत दररोज सकाळी सहा वाजता सनई- चौघडा, सात वाजता श्रींचे धार्मिक उपचार, पवमान पंचसुक्त, नृसिंह नामावली आदींचे पठण व पंचामृत अभिषेक करण्यात आले. दुपारी भजन, सुगमसंगीत, भक्तिसंगीत व सायंकाळी प्रवचन, कीर्तन कार्यक्रम झाले.
शनिवारी (दि. १४) नृसिंह जयंतीचा मुख्य सोहळा झाला. सकाळी श्रींच्या मूर्तीस पवमान अभिषेक झाला. महावस्त्र अलंकार पूजा करण्यात आली. सायंकाळी सूर्योस्तादरम्यान गुलालाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाआरती, प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी समर्थभक्त अजित गोसावी (इंदापूर) यांचे भक्तिसंगीत झाले.
त्यानंतर शुभांगी अरगडे, रमेश रावतेकर व सहकाऱ्यांचे भक्तिसंगीत झाले. सायंकाळी मोहनबुवा रामदासी यांचे प्रवचन झाले. सायंकाळी पाच वाजता विलास गरवारे, सिद्धेश्वर कुरोली यांचे कीर्तन झाले. रविवारी (दि. १५) रात्री श्रींची छबिना, पालखी मिरवणूक काढण्यात येईल. सोमवारी (दि. १६) अंकुश महाराज रणखांबे यांचे काल्याचे कीर्तन होईल. मंदिराचा जीर्णोद्वार, भक्तनिवास, परिसर सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यानिमित्ताने नीरा-नृसिंहपूरचा जणू कायापालट झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.