आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एनटीपीसीने 40 बालिकांसाठी राबवला सक्षमीकरण उपक्रम; उज्ज्वल भविष्य घडवा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन

दक्षिण सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील मुलींच्या सक्षमीकरणाचा एनटीपीसीने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. येथे प्रशिक्षण घेतलेल्या मुलींनी आपली कला जोपासावी. जे शिकलात त्याचे आचरण करा. आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

फताटेवाडी येथील एनटीपीसीमध्ये महिनाभर सुरू असलेल्या बालिका सक्षमीकरण मोहीमेचा समारोप सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, एनटीपीसीचे पश्चिम विभागीय कार्यकारी निर्देशक मुनीश जौहरी सृजना महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विजया राव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमहाप्रबंधक श्रीनिवास मूर्ती यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर बालिका सक्षमीकरण मोहीमेतील मुलींनी वेगवेगळे नृत्य सादर केले. तसेच स्वसंरक्षण बद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले.

या मोहिमेत एनटीपीसीने प्रकल्पग्रस्त गावातील जिल्हा परिषद शाळांमधील १० ते १२ वयोगटातील ४० मुलींना बालिका सक्षमीकरण अभियानांतर्गत आधुनिक तंत्राने शिक्षण देणे, उत्तम सुविधांची ओळख करून देत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले. महिनाभर पालकांपासून दूर राहिल्याने मुलींमध्ये स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेची भावना वाढीस लागेल. ती त्यांना उज्ज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जाईल. मुलींना गणवेश, ट्रॅकसूट, दैनंदिन जीवनातील वस्तूंचे किट, लेखन, वाचन व चित्रकला साहित्य देण्यात आले. या अभियानात योग, स्वसंरक्षण, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, इनडोअर गेम्स, नृत्य, नाटक, संगीत, बालसंसद, वक्तृत्व, संगणक शिक्षण, गणित, विज्ञान, पर्यावरण संरक्षण यांचे प्रशिक्षण दिले.

सुरक्षित समाजासाठी मुलींना धाडस देणे गरजेचे : सातपुते
या वेळी पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, शहरी भागात असे कार्यक्रम राबवले जातात. पण एनटीपीसीने ग्रामीण भागातील मुलींसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. मनोरंजनातून ज्ञान देण्याचे काम केले आहे. मुला-मुलींना समान वागणूक द्या, असे आपण म्हणतो पण अजून तशी परिस्थिती समाजात नाही. समाज नावाचा रथ चालवायचा असेल तर दोन्ही चाके समान असली पाहिजेत. मुलींना अन्याय अत्याचार कशाला म्हणतात हे शिकवले पाहिजे. अन्यायाच्या विरोधात त्यांना उभे केले पाहिजे. सुरक्षित समाजाच्या निर्मितीसाठी अशा कार्यक्रमातून मुलींना धाडस देणे महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...