आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेते अकलूजचे डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गुरुवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. “तुम्ही स्थिर राहा, तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. तुम्हीच ठरवा, खासदार व्हायचे की आमदार,’ अशी आॅफर या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी धवलसिंह यांना दिली.
या वेळी थोरात म्हणाले, डॉ. धवलसिंह हे सर्वांच्या मदतीला धावून जाणारे असून धाडसाबरोबर त्यांच्यात विनयशीलताही आहे. अकलूज आणि परिसरात ते मोठे सामाजिक काम करत आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, यासाठी उद्यापासूनच कामाला लागा, असे थोरात यांनी जाहीर केले.
धवलसिंह हे सामाजिक कार्यात धडपडणारे असून नेतृत्व, कर्तृत्वाबरोबर दूरदृष्टी असणारे तरुण नेते आहेत. काँग्रेसमध्ये येण्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे. त्यांच्याबरोबर आता काही कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले असून मोठे सैन्य पक्षात लवकरच येणार आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
धवलसिंह यांनी चार जिल्ह्यांत लोकांचे जगणे मुश्कील करणाऱ्या बिबट्याला आपल्या जिवाची पर्वा न करता टिपले आहे. हा बिबट्या लोकांना त्रास देत होता. त्याचे काम त्यांनी केले असून आता सोलापूर जिल्ह्यात त्यांना भाजपासोबत असेच दोन हात करावे लागणार आहेत, असे लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख म्हणाले.
चुलते विजयसिंह मोहिते भाजपत
टिळक भवनमध्ये डॉ. धवलसिंह मोहित पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला, या वेळी बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, हुसेन दलवाई, प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, आमदार धीरज देशमुख, सरचिटणीस मोहन जोशी, रामकिशन ओझा, प्रकाश सोनावणे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव झिशान सय्यद, राजाराम देशमुख, अमित कारंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. धवलसिंह हे सध्या त्यांचे चुलते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून दूर आहेत. चुलते सध्या भाजपत आहेत. त्यामुळे या दोन्ही माेहिते कुटुंबीयांचा दोन्ही पक्ष कसा वापर करून घेतात अन् त्यांना काय संधी देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.