आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्रीदिन विशेष:तणावमुक्तीसाठी ओम नमः शिवाय आवर्तन ध्यान साधना, भगवान शिव संकल्पनेच्या आराधनेसाठी कंपन आवर्तन उच्चारण महत्त्वाचे; मेडिटेशन टूलचे संशोधन

सोलापूर (यशवंत पोपळे )एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ध्यान साधना प्रक्रियेसाठी ओम नमः शिवाय हे पंचाक्षरी प्रवाही आवर्तन उच्चारण प्रचलित आहे.

महाशिवरात्रीस पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती मानवी शरीरामध्ये ऊर्जा प्रवेशासाठी पूरक असते. शरीरात ऊर्जा संवर्धन करण्याचे साधन म्हणून ध्यान साधनेकडे ( मेडिटेशन टूल ) पाहिले जाते. म्हणूनच महाशिवरात्र ध्यान साधना करत जागावी, अशी भारतीय लोकजीवनाची पूर्वापार धारणा आहे.

ध्यान साधना प्रक्रियेसाठी ओम नमः शिवाय हे पंचाक्षरी प्रवाही आवर्तन उच्चारण प्रचलित आहे. हजारो वर्षांपासूनच्या ध्यान साधनेतून आणि मनो-संशोधनातून हे उच्चारण सर्वार्थाने प्रभावी असल्याचे सिध्द झाले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून भगवान शिव या संकल्पनेच्या आराधनेसाठी ओम नमः शिवाय हे कंपन आवर्तन उच्चारण जोडले गेले आहे. कदाचित त्यामुळेच शेकडो वर्षांपासून विशिष्ट धर्मापुरतीच ही ध्यान साधना मर्यादित राहिली. अलीकडच्या काळात जसजसे लोकजीवन व्यवहारी होत गेले, तसतसे सामाजिक जीवनातील मानवी तणाव वाढत गेले. औद्योगिक विकास आणि जागतिकीकरणाच्या स्पर्धेत माणसाला मन:शांतीची गरज भासू लागली. मन:शांती कमी होत गेल्याने आत्महत्या, व्यसनाधीनता, हिंसा, विकृती, घृणा, इर्षा, द्वेष आणि दंभासारख्या विघातक प्रवृत्ती-विकृती वाढीस लागल्या. मन:शांती व मनाच्या नियमनासाठी ध्यान साधना हे साधनही विकसित होत चालले आहे.

ध्यान साधनेचे धडे देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था उदयास येताहेत. त्यातही राजकारण, धर्मकारण आणि अर्थकारणाचे गडद रंग डोळस समाजाला दिसत गेले. या वैश्विक लोकजीवनात मूठभर प्रामाणिक संस्था किंवा व्यक्ती जाणीवपूर्वक समाजमान्यतेपासून वंचित राहणे सर्वकालीन स्वाभाविक आहे.

जागतिकीकरणानंतर बहुतांश समाज भौतिक सुखाचा गुलाम होत गेला. माणसांच्या गरजा आणि कुवतीपेक्षा अवास्तव महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या. जगात माणसाशी संबंध येणाऱ्या सर्वच क्षेत्रांमध्ये एकीकडे भौतिक सुख दुणावत गेले आणि दुसरीकडे समाधान मात्र उणावत गेले. मानसिक तणाव कमी करून सुदृढ समाजनिर्मितीसाठी ध्यान साधनेचे महत्त्व वैज्ञानिक, अध्यात्मिक, सामाजिक, वैद्यकीय, मानसशास्त्रीय, पर्यावरणपूरक किंवा खगोलीय आदी विद्याशाखांनी संशोधनांती सप्रयोग अधोरेखित केले.

ओशो म्हणतात, विविध ध्यान साधना प्रकारांच्या मांडणीत भेद आहेत. सर्वांमध्ये मन:शांती, साक्षीत्व आणि अनिर्णयात्मक दृष्टिकोन या त्रिसूत्रीचे मूल बीज आहे. म्हणून ध्यान साधनेला आरंभ असतो, अंत नसतो. ध्यानासाठी मन हे एक साधन आहे. एकदा ध्यान अवगत झाले म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्णत्वाच्या अस्तित्वाची आपोआप जाणीव होईल. ध्यान साधनेपूर्वी मनाची अनियंत्रित सचेतन शांत विश्रामावस्था आवश्यक आहे. ‘शिव सूत्र’ ग्रंथात ओशो म्हणतात, शिव म्हणजे पुरोहित नव्हे. शिव तीर्थंकर आहे. शिव अवतार आहे. शिव क्रांतिद्रष्टा आहे. पैगंबर आहे. तो जे सांगेल त्यात सत्याची आग आहे. आपल्या निर्भय मनाची तयारी ठेवूनच शिव संकल्पनचे निमंत्रण स्वीकारा.

‘शिव सूत्र’ ग्रंथामध्ये ओशोंनी मांडले ध्यान साधनेचे महत्त्व :
जेव्हा वाणी मौन पाळते तेव्हा मन बोलायला लागते. जेव्हा मन मौन धारण करते तेव्हा बुद्धी बोलायला लागते, जेव्हा बुद्धी मौन पाळते तेव्हा आत्मा बोलू लागतो आणि आत्मा मौन पाळतो तेव्हा परमात्म्याशी संवाद सुरू होतो. अशी परमात्मा तथा स्वत्वाच्या दर्शनाची व्याख्या ओशो मांडतात. सम्यक संन्यास संकल्पनेचे पुनरूज्जीवन, बुद्धांचे ध्यान, ताओ उपनिषदाचा अन्वयार्थ, गीतेचा सामाजिक सार, महावीरांचे तत्त्वज्ञान, कृष्णाची बासरी, कबीराचा विद्रोह आणि मीराचे घुंगरू, बायबलची भूमिका आणि कुरआनचे पावित्र्य या विचार सरितांवर ओशोंनी प्रभावी विचार मांडले. ‘ओम’मुळे उच्चाराने मन:शांती, ‘नम:’ उच्चाराने मन:शक्ती व ‘शिवाय’ उच्चाराने मनातील पापी विचारांपासून मुक्ती मिळते.

बातम्या आणखी आहेत...