आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:साेलापुरात दिवसाआड एक बेपत्ता; तरुणी, विवाहितांचे प्रमाण अधिक

संजय जाधव | साेलापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या दाेन महिन्यांत (१४ जुलै ते ११ सप्टेंबर २०२२) ३६ जण बेपत्ता झाल्याच्या नाेंदी पाेलिस ठाण्यांच्या दफ्तरी झाल्या. सरासरी दिवसाआड एक जण बेपत्ता हाेत असल्याचे हे निदर्शक आहे. बेपत्ता हाेणाऱ्यांमध्ये युवक, युवती, विवाहिता यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. परत येणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के आहे. आल्यानंतर संबंधित पाेलिस ठाण्यांमध्ये त्यांचे समुपदेशन हाेते. त्यांच्याशी संवाद साधताना काैटुंबिक कलह, नैराश्य, प्रेम प्रकरण, बेराेजगारी याच प्रमुख समस्या असल्याचे ही मंडळी सांगतात.

गेल्या दाेन महिन्यांतील आकडेवारी ही धक्कादायक आहे. बेपत्ता झालेल्या ३६ जणांमध्ये २ ते १७ वयोगटातील १० जण आहेत. त्यात ५ तरुण, ६ तरुणी आणि एका ज्येष्ठ व्यक्तीचा समावेश आहे. सर्वाधिक घटनांची नाेंद एमआयडीसी पाेलिस ठाण्यात तर सर्वात कमी नाेंदी सदर बझार व जोडभावी ठाण्यात झाल्या आहेत. त्याचा श्लेष काढताना प्रामुख्याने कामगार वसाहतींमध्येच ही समस्या आता गंभीर झालेली आहे. काेविडपश्चात आैद्याेगिक घडामाेडींमध्ये कामगार कपात सुरू झाली. त्याचाही ताण श्रमजीवी मंडळी घेत असल्याचे दिसून येते.

तक्रारींचे पुढे काय हाेते?
पोलिसांमध्ये मिसिंग (हरवल्याची नाेंद)ची प्राथमिक नाेंद झाल्यानंतर त्यांची छायाचित्रे घेऊन शाेध माेहीम, चाैकशीला सुरुवात हाेते. काही दिवसांतच बेपत्ता झालेले परत येतात. त्या वेळी त्यांचा जबाब घेण्यात येताे. त्या वेळी घरगुती भांडणे, राग, प्रेमभंग, पतीचा जाच, सासुरवास ही कारणे पुढे येतात. त्यानंतर घरी पाठवण्यात येते.

कुटुंबात संवाद ठेवा
घरातील तरुण मुला-मुलांशी मैत्रिपूर्ण संवाद ठेवा. त्यांच्यावर अपेक्षा लादू नका. त्यांच्या आवडी -निवडीनुसार जे चांगले त्याला पाठबळ द्या. परंतु हे असे हाेऊच शकत नाही, खपून घेणार नाही, असे निर्वाणीचे काही बाेलू लागलात की काैटुंबिक स्वास्थ्य बिघडते. मग त्यातून ‘पळ’ हीच वाट खुणावते. ही मंडळी घरी आल्यानंतर रागावू नका. सुसंवाद करा.’’
निशा भाेसले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

बहुतांश परत येतात
क्षणिक रागातून घराबाहेर पडणारी मंडळी काही दिवसांनी शांतपणे परत येतात. त्यांच्या कुटुंबीयांना बाेलावून समुपदेशन करताे. तरुण आणि ज्येष्ठांचे प्रश्न वेगळे आहेत. घरातून निघून जाणे हा एक सामाजिक प्रश्न बनलेला आहे. त्यावर उपाय म्हणजे एकमेकांशी बाेलत राहणे. समजून घेणे. त्याने अनेक प्रश्न सुटतील.’’
राजन माने, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...