आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस:पावसामुळे बाजार समितीत कांदा भिजला,दरात क्विंटलमागे 500 रुपयांची घसरण

सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी सकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील वातावरणच बदलून गेले. शाळेसाठी जाणाऱ्या मुले व पालकांना छत्री रेनकोट काढावे लागले तर काही जणांनी भिजतच जाणे पसंत केले. यामुळे सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या लोकांची धावपळ झाली. या पावसाचा बाजार समितीमध्ये लिलावास आलेल्या कांद्याला फटका बसला. काही शेतकऱ्यांनी स्वत:हून कांदा झाकून ठेवला होता. पावसामुळे मात्र कांद्याचे दरात घसरण पाहण्यास मिळाली. प्रतिक्विंटल ५०० रुपयांची घसरण झाली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारपासून ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी सकाळीच पावसाला सुरुवात झाली. यामुळे द्राक्षे, आंब्यासह काढणीस आलेल्या हरभरा, गहू व ज्वारी पिकाला फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना सर्वाधिक फटका बसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. पाऊस मोठा नसला तरी द्राक्ष बागायतदारांचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी द्राक्षे तयार झाली आहेत, त्या बागांचे नुकसान झाले आहे.

दिवसभर सूर्यदर्शन नाही, काही भागात हलक्या सरी
सोलापूर । शहरात ढगाळ वातावरणासह शुक्रवारी दिवसभर सूर्यदर्शनच झाले नाही. शहरातील काही परिसरात हलक्या सरी बसरल्या. शहरातील बाळे परिसर, शिवाजीनगर, एसटी स्टँडचा परिसर, नवी पेठ, जुळे सोलापूर, मडकी वस्ती, पाण्याची टाकी परिसर, जुळे सोलापूरासह शहरातील इतर नगरात सकाळी हलक्याशा सरी पडल्या. शहरात दिवसभर हवामान ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी वाऱ्याच्या कमी दाबामुळे कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपीट व हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील हवामान पूर्ववत होऊन तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याची माहिती विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. विजय अमृतसागर व हवामानतज्ज्ञ डॉ. विकास लोंढे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...