आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सामाजिक, धर्मादायी अाणि सहकारी संस्थांमध्ये नि:स्पृहपणे काम करणारी ती व्यक्ती... समाजबांधवांच्या दु:खद प्रसंगात मदतीला धावणारी सहृदयी... याच सच्छील हृदयाने हजाराेंच्या तिरड्या त्यांनी बांधलेल्या... पुढील साेपस्कारही पूर्ण केले... मात्र, अशा सहृदयाला पाेहाेचवायला मात्र फक्त महापालिका कर्मचारी हाेते. त्यांनी ना तिरडी बांधली, ना हार घातला... प्लास्टिक बॅगेत गुंडाळलेला देह कुटुंबातील चार सदस्यांसमोर अग्नीस अर्पण केला.
माेतीलाल बाळप्पा भाेळा यांची ही करुण कहाणी. लक्ष्मी सहकारी बँकेचे संचालक, पंढरपुरातील पद्मशाली धर्मशाळेचे सहसचिव, भू. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या पालक-शिक्षक संघाचे संस्थापक अशा अनेक पदांवर काम करत गरजूंपर्यंत पाेहाेचण्याची त्यांची तळमळ. लक्ष्मी बँकेतील काही कर्ज प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी ते बँकेत गेले. बँकेच्या रिक्षातून त्यांचा प्रवास झाला. गरजूंच्या कर्ज प्रकरणांवर त्यांनी सह्या केल्या. त्यानंतर घरी गेले. श्वास घेताना त्रास सुरू झाला. रुग्णालयात दाखल झाले. उपचार सुरू असताना रविवारी रात्री वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचा जीवनप्रवास थांबला... ताेही जगात धुमाकूळ घालणाऱ्या संसर्गानेच.
सेवेचे व्रत घेतलेला वारकरी
कुठल्याही कामात सेवा हाच स्वर्गीय भाेळा यांचा अंतिम उद्देश असायचा. दर पंधरा दिवसांनी ते पंढरपूरच्या पद्मशाली धर्मशाळेला जात. तेथील सुविधा, भक्तांच्या साेयींची पाहणी करत. या धर्मशाळेच्या विस्तारित बांधकामात त्यांचा माेठा सहभाग हाेता. स्वत:च्या पैशातून त्यांचा प्रवास असे. अगदी चहादेखील ते स्वत:च्या पैशांनी प्यायचे. धर्मशाळेच्या पैशाचे ते खरे विश्वस्त हाेते अन् सेवेचे व्रत घेतलेले वारकरीही...
नावाप्रमाणेच भाेळा, परंतु शायरीची भारी हाैस
शेराेशायरीची त्यांना खूप आवड होती. कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय करून देताना शब्दसुमनांची उधळण करत...एक शेर असा लक्षात राहणारा...
लाेगाें काे कहते सुना अक्सर, जिंदा रहे ताे फिर िमलेंगे...
मगर इस दिल ने महसूस किया है, मिलते रहेंगे ताे जिंदा रहेंगे...
मोतीलाल भोळा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.