आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:मुलांच्या कलागुणांना वाव देण्याची स्पर्धेच्या माध्यमातून मिळते संधी; आमदार प्रणिती शिंदे यांचे कार्यक्रमात प्रतिपादन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमुळे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संधी मिळाली नाही तरी ती संधी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून मिळत आहे. मुलांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता असते, त्याचबरोबर इतर कलागुण असतात. या कला दाखवण्यासाठी या स्पर्धा उपयुक्त ठरतात. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. हाच आत्मविश्वास भविष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये करिअर करताना उपयुक्त ठरतो. मुलामुलींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना गिफ्ट देण्यापेक्षा त्यांना विविध ठिकाणी घेऊन जावा, तेथील अनुभव द्यावा. त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. हाच अनुभव त्यांच्यामध्ये चिरकाल राहील, त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळेल. तसेच शासनाकडून कला व क्रीडा या क्षेत्राकडे कमी प्रमाणात लक्ष दिले जाते होते, भविष्यात जास्तीत जास्त निधी या विभागाला कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

हुतात्मा स्मृती मंदिरात सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे आयोजित १८ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. अंतिम फेरीच्या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कलावंत राजा बागवान, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, महानगर शाखा अध्यक्ष अजय दासरी उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ममता बोल्ली यांनी केले. याप्रसंगी परीक्षक पी.डी. कुलकर्णी, शुभांगी पाठक,ज्ञानेश्वर गायकवाड, संजय हळदीकर, सुरेंद्र वानखेडे, कार्यक्रम अधिकारी मच्छिंद्र पाटील उपस्थित होते.

२० नाटकांचे सादरीकरण होणार
बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सोलापुरात होत आहे. त्यामध्ये एकूण २० नाटकांचे सादरीकरण होणार आहे. साेमवारी आरंभ क्रिएशन आर्ट चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे यांचे चिमटा, अश्वमेध कल्याण गोष्टीची गोष्ट,अश्वघोष कला अकादमी नागपूर यांचे थेंब थेंब श्वास, तर डॉ. बापट बालशिक्षण मंदिर सांगली यांचे द पॉवर गेम या नाटकाचे सादरीकरण झाले.

सोलापूरचे नाव उज्ज्वल होईल
राज्य बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून बालकांचा कलाविष्कार पाहण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले कलाकार भविष्यात चांगले नाट्य कलावंत होतील. नाट्य चळवळीचा इतिहास असलेल्या सोलापूरचे नावही उज्ज्वल करतील.
प्रकाश यलगुलवार, नाट्य परिषदेचे अध्यक्ष

मुलांच्या कलेला वाव
मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी शासनाकडून ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमुळे कलाकार, लेख व निर्माते व प्रेक्षक तयार होतात. ही स्पर्धा पाहण्यासाठी रसिक, पालकांनी आपल्या पाल्यांसमवेत यावे.
राजा बागवान, कलावंत

बातम्या आणखी आहेत...