आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरच्या लोकांचा विरोध होईल म्हणून प्रेमीयुगुलाने पळून जाऊन विवाह केला. परंतु १५ दिवसांनी मुलीच्या कपिलापुरी (ता. परंडा, जि. धाराशिव) येथील कुटुंबीयांनी मुलाच्या गावी महातपूर (ता. माढा, जि. सोलापूर) येथे येऊन त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहण केली. त्यानंतर त्यांनी मुलीला सोबत नेले. याप्रकरणी माढा पोलिस ठाण्यात मुलीच्या वडिलांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ११) हा प्रकार घडला.
एका लग्नसमारंभात महातपूर येथील ओंकार शीतल झळके याची कपिलापुरी येथील मनाली सुदर्शन देवळकर हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. कुटुंबीयांचा विरोध होईल म्हणून त्यांनी पळून जाऊन तीन मे रोजी नाशिकमध्ये लग्न केले. महातपूर (ता. माढा) येथे दोघांचा संसार सुरू झाला. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार परंडा पोलिसांत दिली. ओंकार व मनाली दोघांनी परंडा पोलिसांत हजर राहून प्रेमविवाह केल्याचे पोलिसांना सांगितले. स्वेच्छेने ओंकारशी लग्न केल्याचा जबाब मनालीने पोलिसांना दिला.
त्यानंतरही गुरुवारी रात्री एकच्या सुमारास मुलीचे वडील सुदर्शन नरसिंग देवळकर यांच्यांसह १३ जणांनी ओंकारच्या घरात घुसून कुटुंबीयांना लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मनालीला बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून नेण्यात आले. ओंकार झळके याच्या फिर्यादीवरून मनालीच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल झाला आहे. हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी ओंकारने केली आहे.
पत्नीला सुखरूप मिळवून न दिल्यास आत्महत्येचा इशारा
मी मनालीवर प्रेम करतो. तिच्याशी रीतसर विवाह केला आहे. मला व माझ्या कुटुंबीयांना मनालीच्या वडिलांसह अन्य नातेवाइकांनी घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. मनालीला ते बळजबरीने घेऊन गेले. ते माझ्या पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून देण्याच्या तयारीत आहेत. माझी पत्नी सुखरूप मिळवून न दिल्यास माढा पोलिस ठाण्यासमोर उपोषण करत आत्महत्या करणार असल्याचे निवेदन ओंकारने पोलिस अधीक्षकांसह गृहमंत्र्यांनाही पाठवले आहे.
मुलीच्या जबाबानंतर पुढील कारवाई
गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यासाठी पथक स्थापन केले आहे. मुलीचा शोध घेऊन तिचा जबाब घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- बी. एस. खणदाळे, पीआय, माढा
मुलीने स्वेच्छेने लग्न केल्याचा जबाब दिला
संबंधित मुलीने लग्न झाल्यानंतर परंडा पोलिस ठाण्यात स्वत: येऊन स्वेच्छेने लग्न केले असल्याचा जबाब दिला आहे. - अमोद भुजबळ, पोलिस निरीक्षक, परंडा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.