आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनविहारातील निसर्ग फेरीला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:वारसा दिननिमित्त इंटॅक्ट तर्फे आयोजन; मियावाकी जंगल पाहून वारसा प्रेमी चकित

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक वारसा दिनानिमित्त इंटॅक्ट सोलापूर विभागाने सिद्धेश्वर वन विहारात आयोजित केलेल्या निसर्ग फेरीला वारसा प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळची थंडीची वेळ असूनही सर्व वयोगटातील नागरीक वेळेवर उपस्थित झाले. वनविभाग कर्मचारी व निसर्गप्रेमी संजयजी भोईटे, ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॅा निनाद शहा व इंटॅक्ट वारसाप्रेमी अनिल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वन विहारातील विविध वनस्पती, गवताचे प्रकार, पक्षी आणि त्यांच्या सवयी यांची चर्चा करत, फोटो काढत, नोंदी करत कोवळ्या उन्हात फेरी झाली. केवळ दहा महिन्यात दहा वर्षा एवढी वाढ झालेले मियावाकी जंगल पाहून सर्वजण चकित झाले.

वड, पिंपळ, चाफा, चिंच, कडुनिंब या ओळखीच्या झाडांसोबत हिरडा, बेहडा, चंदन, अंजन, कांचन, कचनार, आपटा, खैर, बाभूळ, पारिजात,बकुळ, जांभूळ, बहावा, पळस, पांगारा, बेल, बकनिंब, काशीद, हादगा असे असंख्य वृक्ष त्यांच्या वैशिष्ट्यासह जाणून घेतां आले. तर रानतुळस, भालागवत, रोशा, गोंडूळ असे अनेक गवताचे प्रकार, बांबू हेही एक प्रकारचे गवत असल्याची माहिती तसेच आपटा, कांचन आणि बेहडा यातला फरक काय याची रंजक माहितीही मिळाली. पोपट, बुलबुल, कोतवाल, तांबट अशा पक्षांचे दर्शन झाले. निरीक्षण मनोऱ्यावरून वन विहाराचा विस्तृत हिरवा परिसर पाहता आला. हे महाराष्ट्रातले दुसरे सगळ्यात मोठे राखीव वन क्षेत्र आहे.

फेरीनंतर निसर्ग परिचय व वाचन केंद्रात विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, कीटक व सरपटणारे प्राणी यांची माहिती जाणून घेतां आली. सोलापूर परिसरात 350 पेक्षा जास्त पक्षी दिसतात. त्यांची सूची वेळोवेळी डॅा निनाद शहा यांनी प्रकाशित केली आहे हे समजले. शेवटी इंटॅक्ट समन्वयिका सीमंतिनी चाफळकर यांनी मार्गदर्शक व सहभागींचे आभार मानले.

या फेरीच्या आयोजनासाठी श्वेता कोठावळे, अनिल जोशी यांनी परिश्रम घेतले. फेरीत मनिष झानपुरे, प्रीती श्रीराम व इतर अनेक जण सहकुटुंब सहभागी झाले तर सुयश गुरूकुलचे शिक्षक वृंद, प्रा शर्मिला करपे, डॅा संध्या रघोजी, शिरीष दंतकाळे, कोकणे बंधू हेही उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...