आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पालखी सोहळा व्यवस्थापन : समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती; 15 लाख भाविक येण्याचा अंदाज

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आषाढी वारीसाठी प्रशासनाची तयारी, प्रथमच समन्वयासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो वारकरी दाखल होतात. पालखी सोहळ्यासह, वारकरी, नागरिकांना अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासह, सर्वांशी समन्वय ठेवून प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यासाठी पालखी सोहळा व्यवस्थापनासाठी नोडल अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. वारी सोहळ्यासाठी पहिल्यांदाच नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे वारी सोहळा झाला नव्हता. यंदाच्या वर्षी १५ लाख वारकरी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूर, पालखी मार्गावर सहभागी होण्याचा अंदाज आहे. वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. वारी सोहळ्यासाठी तब्बल २५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना फौजफाटा लागणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची वारी सोहळ्याचे प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. जाधव यांनी त्यानिमित्ताने सातत्याने आढावा बैठकांची मोहीम सुरू केली आहे.

पालखी मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे कामामुळे काही पालखी मुक्कामाचे ठिकाण, विसाव्याचे ठिकाण, गोल रिंगण सोहळ्याचे ठिकाण यामध्ये बदल झालेला आहे. बदलाची ठिकाणे इतर सोयीच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. रस्ता रुंदीकरण व उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. ही कामे पालखी ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर पूर्ण करण्यात येणार आहेत. विविध संतांच्या पालखी सोहळ्याने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले आहे.

प्रमुख दहा संतांचे पालखी सोहळ्याचे स्वागत, पालखी सोहळा प्रमुखांशी समन्वय ठेवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, त्याचे निराकरण करणे, पंढरपूर शहरामध्ये पालखीचे आगमन झाल्यानंतर पालखी सुस्थित मुक्कामाचे ठिकाणी पोहोचणे कामी आवश्यक सर्व यंत्रणांशी समन्वय साधणे, पालख्यांचे पंढरपूर मुक्कामी गैरसोय होऊ न देण्याची खबरदारी घेणे, आषाढी एकादशीनंतर पालखी सोहळा पंढरपूरमधून पुन्हा माघारी जाईपर्यंत आवश्यक त्या विभाग, संपूर्ण पालखी मार्गावरील संबंधित खातेप्रमुखांची समन्वय साधण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

पंढरपूर शहर व परिसरातील स्वच्छतागृहाचे समन्वय नगरपरिषदचे सहाय्यक आयुक्त आशिष लोहकरे यांच्याकडे सोपवले आहे. मंदिर परिसर, पालखी मार्गावरील अग्निशमनचे व्यवस्थापन, समन्वयक महापालिकेचे अग्निशमन विभागाचे केदार आवटे यांच्याकडे सोपवली आहे. पालखी मार्गावरील ग्रामीण भागात आरोग्य सुविधांसाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, शहरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्याकडे समन्वय आहे. वारी सोहळ्यात पंढरपूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, पालखी सोहळ्यातील बैल, घोडे यांच्यावर उपचाराची जबाबदारी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सोनवणे यांच्याकडे आहे.

बातम्या आणखी आहेत...