आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकऱ्यांसाठी 'पंढरीची वारी' अ‍ॅप:पिण्याचे पाणी, हॉस्पिटल, शौचालयांची मिळणार माहिती; 21 जूनला लाँचिंग

सोलापूर | विठ्ठल सुतार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या आषाढी वारीसाठी १५ लाखांवर भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. वारकऱ्यांना गर्दीच्या काळात मदत व्हावी म्हणून पंढरपूर मंदिर समितीने प्रथमच ‘पंढरीची वारी’ हे मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. त्यावर वारीकाळात प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा व पंढरपुरात वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती मिळेल. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांनी दीड महिन्यांत या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. प्ले स्टोअरवर पंढरीची वारी Pandharichi Wari या नावाने उपलब्ध आहे.

सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी बनवले अ‍ॅप... : पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील सुदर्शन मकर, आशुतोष देशपांडे, गौरांग मुळे, अभिजित नलवडे, सैफ शेख व मोहित मुजावर या विद्यार्थ्यांनी अ‍ॅप तयार केले आहे. आगामी काळात हेल्पलाइन क्रमांक, गॅस सिलिंडरची सुविधा, एसटी, रेल्वेचे वेळापत्रकचाही अ‍ॅपमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे टीमप्रमुख मकर यांनी सांगितले.

वारकऱ्यांना मिळणार सुविधांची माहिती
यंदा आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अ‍ॅपबाबत कल्पना सुचविली. वारकऱ्यांना सुविधा पुरविताना प्रशासनावर मोठा ताण येतो. पाणी, शौचालय, हॉस्पिटल या सुविधा देण्यासाठी अ‍ॅप महत्वाची भूमिका बजावेल. अ‍ॅपमध्ये गरजेप्रमाणे आणखी बदल केले जाणार आहेत. - गजानन गुरव, मुख्य कार्यकारी अधिकारी. मंदिर समिती, पंढरपूर

कुठे वापरता येणार अ‍ॅप
पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर या अ‍ॅपचा वापर करता येणार आहे. शिवाय पंढरपूर येथे सर्व पालख्या पोहोचल्यानंतरही हे अ‍ॅप दिशादर्शक ठरणार आहे. विठ्ठल मंदिराकडे जाण्याच्या मार्गाबरोबरच महत्त्वाची ठिकाणे दाखवली जाणार आहेत. पालखीची मुक्कामाची ठिकाणे, विसावा या ठिकाणी असलेल्या सुविधा या अ‍ॅपवरून शोधणे सोपे होणार आहे.

काय आहे अ‍ॅपमध्ये...
वारी मार्ग ते पंढरपूर शहरात पोहोचेपर्यंत हे अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे. वारी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टॅँकर, शौचालय, जवळील शासकीय कार्यालये, पोलिस ठाणे, हॉस्पिटल, मंदिर, वाहनतळ, शाळा या गोष्टी अ‍ॅपवर दिसतील. मुक्कामाच्या ठिकाणी वा दिंडी मार्गक्रमण करताना वारकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समिती व्यवस्थापनाने हे अ‍ॅप विकसित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...