आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर:पंढरीत वारकऱ्यांपेक्षा पोलिसांची गर्दी अधिक; सलग दुसऱ्या वर्षीही निर्बंध कायम, मुख्यमंत्री करणार पूजा

पंढरपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आषाढीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे. - Divya Marathi
आषाढीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांविना आषाढी यात्रा भरवली जात आहे. गर्दी टाळून केवळ प्रातिनिधिक स्वरूपात यंदाही जिल्हा प्रशासनाने यात्रेचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. वारकऱ्यांविना भरणाऱ्या यात्रेच्या बंदोबस्तासाठी सुमारे २ हजार ७०० पोलिसांचा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या गर्दीपेक्षा सध्या पोलिसांची गर्दी दिसू लागली आहे.पंढरपूर आणि आजूबाजूच्या गावांमधून सुमारे चारशे ते साडेचारशे इतके मठ, धर्मशाळांची संख्या आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक या मठ, धर्मशाळांमधून वास्तव्यास असतात. सात दिवसांपासून पोलिसांमार्फत वेळोवेळी मठ, धर्मशाळांची पाहणी केली जात आहे. सर्व मठाधिपतींना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

एसटीचे सुमारे २२ कोटींचे होणार नुकसान
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी चार वाजेपासून पंढरपुरातील एसटीची प्रवासी वाहतूक (आवक, जावक) बंद करण्यात आली आहे. २५ जुलै रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पंढरपूर एसटी आगाराला ५० लाख रुपयांचा आर्थिक फटका बसणार आहे. आषाढी यात्रा भरली असती तर राज्याच्या विविध भागांतून तीन हजार एसटीचे नियोजन गृहीत धरून सुमारे २२ ते २३ कोटी रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले असते.

पालख्या शिवशाहीमधून
सोमवार, दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या शिवशाहीतून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत.परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना रुग्णसंख्येत वाढ
आषाढीच्या तोंडावर सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ४७३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात पंढरपूर तालुक्यातील शनिवारी १३१ जणांची नोंद झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा जागी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...