आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील महापुरुषांच्या सातत्याने अवमान होत असल्याप्रकरणी पंढरपूर बंदला प्रतिसाद मिळाला. सोमवारी एकादशी असतानाही पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. श्री विठ्ठल मंदिर परिसरात या बंदला सकाळी प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी कॉरिडॉर झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्यानंतर मात्र मंदिर परिसरातील दुकानेही बंद झाली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व भाजपच्या काही नेत्यांनी मागील काही दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी या बंदचे आवाहन केले होते. यात भाजप वगळता सर्व पक्ष व संघटना सहभागी होत्या. सकाळी महात्मा फुले यांच्या स्मारकापासून आंदोलकांनी मोर्चा काढला. चौफाळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा स्टेशन रोडवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आला. त्याठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चेकऱ्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाचे फलक घेऊन मोर्चेकऱ्यांनी राज्यपाल हटाव, चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशा घोषणा दिल्या. या वेळी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, संभाजी ब्रिगेड, समता परिषद यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील संघटना, स्थानिक पदाधिकारी सहभागी होते. ‘आम्ही भारताचे लोक’च्या बॅनरखाली सर्व संघटना व पक्ष एकत्र आले. या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
कॉरिडॉर समर्थनाच्या घोषणा होताच, विठ्ठल मंदिर परिसरातील दुकाने पटापट बंद झाली
महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान प्रकरणामुळे शहरातील बहुतांश भागातील दुकाने सकाळपासून बंद होती. मात्र श्री विठ्ठल मंदिर परिसरातील दुकाने सकाळी सुरूच होती. बंदचे आवाहन करणाऱ्या संघटनांचा मोर्चा चौफाळ्यात आला असता मंदिर परिसरातील दुकाने सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे मोर्चातील काही पदाधिकाऱ्यांनी ‘पंढरपूर कॉरिडॉर झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर लगेचच मंदिर परिसरातील दुकानेही बंद करण्यात आली. तसेच मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा असल्याच्या पोस्ट समाज माध्यमात व्हायरल केल्या.
शाळा, महाविद्यालये, मेडिकल्स, शासकीय कार्यालये वगळता सर्व दुकाने दुपारपर्यंत बंद
मार्गशीर्ष एकादशी असूनही, पंढरपूर शहरातील बहुतांश भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये, मेडिकल्स, शासकीय कार्यालये वगळता सर्व दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद होती. इसबावीसह उपनगरी भागातही दुकाने बंद ठेवली. शहरातील स्टेशन रोड, नवी पेठ, जुनी पेठ, संत पेठ, भादुले चौक, प्रदक्षिणा मार्गावरील दुकाने दुपारपर्यंत पूर्णपणे बंद होती. त्यामुळे बंदला सर्व समाज घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा ‘आम्ही भारताचे लोक’च्या संयोजकांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.