आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठुरायाच्या चरणी भाविकांची मांदियाळी:नित्यपूजेची पुढच्या वर्षासाठी 300 जणांची बुकिंग, मंदिराला 1 कोटी 8 लाख रुपयांचे उत्पन्न

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला भाविकांची मोठी गर्दी होते. ज्याला त्याला नित्यपुजा याची देही याची डोळा करण्याची इच्छा असते, पण त्यासाठी पैसे लागतात. नित्यपुजेसाठी पुढच्या वर्षीची बुकींग जवळपास ७५ टक्के पूर्ण झाली असून ३६५ दिवसांपैकी आतापर्यंत ३०० जणांनी बुकींग केले. यातून मंदिराला 1 कोटी 8 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
पुजा, आराधनेची इच्छा पूर्ण

आषाढी वारी असो की, इतर महत्त्वाचे प्रसंग दररोज विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरात कायमच भाविकांची नेहमीच गर्दी असते. यापैकी अनेक भाविकांच्या विठुरायाच्या चरणाला स्पर्श करण्याची, त्याची पूजाअर्चा करण्याची मनोमन इच्छा असते.

नित्यपुजेसाठी इच्छूकांची मांदियाळी

या पूजाअर्चेसाठीही इतके जण इच्छूक आहेत की, पंढरपूरच्या मंदिरातील दैनंदिन पूजेसाठी पुढील वर्षीपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. या उपक्रमातून पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराची भरघोस कमाई झाली आहे. २०२४ या एका वर्षातील नित्यपूजेसाठी एकूण ३०० बुकिंग झाली आहेत. या माध्यमातून विठ्ठल मंदिराला ७५ लाख रुपये तर रुक्मिणी मंदिराला ३३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

रोज होते नित्यपूजा

पंढरपुरात दररोज पहाटे चार ते पाच या वेळेत विठ्ठल आणि रूक्मिणी मातेची नित्यपूजा करण्यात येते. यामध्ये विठ्ठलाच्या नित्येपूजेसाठी २५ हजार तर रुक्मिणीच्या नित्येपूजेसाठी ११ हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते. हे शुल्क भरल्यानंतर ठरलेल्या दिवशी संबंधित भाविक आणि त्याच्यासोबतच्या दहाबारा लोकांना नित्यपूजेसाठी मंदिरात प्रवेश देण्यात येतो.

श्रद्धेला मोल नाही

विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी ही नित्यपूजा करायला मिळावी, अशी प्रत्येक भाविकाची इच्छा असते. करोनाच्या काळात विठ्ठल मंदिरातील नित्यपूजा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नित्यपूजेसाठी बुकिंग असलेल्या भाविकांची संधी हुकली होती. मात्र, जानेवारी महिन्यापासून विठ्ठल-रखुमाईच्या नित्यपूजेला सुरुवात झाली असून रोज पाच भाविक कुटुंबांना मंदिरात प्रवेश दिला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिर प्रशासन जागरुक असून मोठी खबरदारी घेतली जात आहे.