आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी पत्रकार संघाकडून आयोजन:संत शिरोमणी नामदेव महाराज जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमान 21 दिवसांची सायकल वारी

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणारे तसेच भागवत धर्माची पताका अटकेपार फडकविणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवार (दि.4 नोव्हेंबर) संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा गुरुवार (दि. 24 नोव्हेंबर) 2022 पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशी भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 21 दिवसांची सायकल वारी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे व संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे सचिव डॉ. अजय फुटाणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ, संत नामदेव समाजोन्नती परिषद व श्री संत नामदेव समाज युवक संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास, केशव महाराज नामदास, कृष्णदास महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास व माधव महाराज नामदास यांच्या आशीर्वादाने या सायकलवारीचे आयोजन करण्यात आले आहे.

2100 किमीचा प्रवास

श्री क्षेत्र पंढरपूर, फलटण, सासवड, पुणे, आळंदी, देहू, नाशिक, त्र्यंबकेश्वर मार्गे ही सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यातून अमृतसर मार्गे घुमान असा 2100 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सोबत संत नामदेव महाराज व गुरू गोविंदसिंह यांचा ग्रंथ, पादुका, भागवत धर्माची पताका व पालखी रथ असणार आहे.

पंढरपूरपर्यंत मोफत गाडी

या सायकल वारीत 18 ते 30 वयोगटातील स्त्री, पुरुष सायकल स्वारांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. या सायकलस्वारांचा श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान पर्यंतचा चहा, नाष्टा, जेवण व निवास तसेच सायकलस्वाराची सायकल पंढरपुरपर्यंत गाडीने मोफत आणण्याचा सर्व खर्च संघटने मार्फत केला जाणार आहे.

संपर्क साधून नोंदणी

मात्र, घुमान ते पंढरपूर पर्यंतचा परतीचा रेल्वेचा प्रवास सायकलस्वाराला स्वतः करावा लागणार आहे. या सायकल वारीत सहभागी होण्यासाठी सूर्यकांत भिसे (वेळापूर) 9822023564, डॉ अजय फुटाणे (पुणे) 9422362595, निवृत्ती महाराज नामदास (पंढरपूर) 8329084187, शंकर टेमघरे (पुणे) गणेश जामदार (अकलूज) 9767799595, सिध्देश हिरवे (शिक्रापूर) 8087762782 यांच्याशी 30 सप्टेंबर 2022 पुर्वी संपर्क साधून नाव नोंदणी करावी. या सायकल वारीस आषाढी वारी सोहळ्यातील मानाच्या प्रमुख पालखी संस्थांचे सहकार्य लाभणार असल्याचे भिसे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...