आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलाच्या दारी:आठ दिवसांत दोन लाख 30 हजार भाविकांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन, कार्तिकीदरम्यान 1224 कोरोना टेस्ट, निघाले केवळ 14 पॉझिटिव्ह

पंढरपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूरकरांना कार्तिकी यात्रेमुळे ज्या कोरोनाची भीती होती ती भीती आता कमी झालेली आहे. यात्राकाळात सुमारे ४ लाखांवर भाविक पंढरीत येऊन गेले. १२२४ जणांच्या कोरोना तपासण्या झाल्या. त्यापैकी केवळ १४ जणच पॉझिटिव्ह आढळले. हे प्रमाण जेमतेम १.२ टक्के आहे. यात्रेनंतर अद्याप तरी नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी दिसत नाहीत.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दीड वर्षातील बहुतांश दिवस विठ्ठल मंदिर पूर्णपणे बंद होते, तर ६ यात्राही रद्द कराव्या लागल्या होत्या. यावर्षी मात्र कोरोनाचा प्रभाव घटल्यानंतर राज्य सरकारने कार्तिकी यात्रेला खुली परवानगी दिली. एसटीचा संप असूनही यात्रेच्या काळात म्हणजे ११ ते १६ नोव्हेंबर या ५ दिवसांत पंढरीत ४ लाखांहून अधिक वारकरी येऊन विठ्ठल दर्शन, चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा करून परत गेले.

कार्तिकीदरम्यान १२२४ कोरोना टेस्ट, निघाले केवळ १४ पॉझिटिव्ह

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कार्तिकी यात्रेस लाखो वारकरी आले होते. विठ्ठलाचे दर्शन २४ तास सुरू केल्यानंतर ८ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या आठ दिवसांत तब्बल दोन लाख ३० हजार ४० वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा कार्तिकी यात्रा भरली होती. यात्रेसाठी मोठ्या संख्येने वारकरी येतील, अशी अपेक्षा होती, मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भाविकांची संख्या निश्चितपणे कमी झाली. तरीही एकादशीच्या दिवशी सुमारे साडेतीन लाखांहून अधिक वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रा पोहोचवली. या एकाच दिवशी तब्बल ४४ हजार १०० वारकऱ्यांनी विठ्ठल दर्शन घेतले. कार्तिकी एकादशी दिवशी दर मिनिटाला ३५ वारकऱ्यांना दर्शन मिळाले.

तर २४ तास दर्शन सुरू केल्यानंतर आठ ते ११ नोव्हेंबर या चार दिवसांत ९९ हजार वारकऱ्यांना दर्शन मिळाले. या दरम्यान प्रतिमिनिटाला केवळ १५ वारकरी दर्शन घेत होते. १२ ते १४ नोव्हेंबर या तीन दिवसांत ८६ हजार ९४० वारकरी दर्शन घेऊन तृप्त झाले. या तीन दिवसांत दर्शनाचा वेग थोडा वाढून तो प्रतिमिनिट २२ इतका झाला होता.

एकादशीच्या दिवशी २४ तासांत प्रतिमिनिट ३५ या वेगाने ४४ हजार १०० भाविकांनी विठ्ठल दर्शनाचे पुण्य पदरी बांधून घेतले. कळस दर्शन, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान करून लाखो वारकरी वारी पोहोचवल्याचे समाधान घेऊन गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या यात्रेमुळे पंढरपूरचे अर्थकारणही गतिमान झाले आहे. व्यापारी वर्गातही उत्साहाचे वातावरण आहे.

मुखदर्शनाने भाविक सुखावले

विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन हे वेगळेपण आहे. विठ्ठलाच्या पायी डोई ठेवण्याच्या हेतूने आलेल्या वारकऱ्यांना यंदा कोरोनामुळे ते दर्शन मिळाले नाही. मात्र, कोणत्याही अडथळ्याशिवाय, पूर्वीपेक्षा अधिक जवळून विठ्ठल मनसोक्तपणे न्याहाळून पाहता आला. त्यामुळे भाविक सुखावल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...