आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल चरणी दान पावले:पंढरपूरमध्ये तब्बल 31 किलो सोने, 1050 किलो चांदी अर्पण; अनेकांनी खोटे दागिनेही दिले

पंढरपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूरच्या विठ्ठल चरणी सधन भाविकांनी एकीकडे कोट्यवधीचे दान अर्पण केले. तर दुसरीकडे ज्या गरिबांना खरे दागिने अर्पण करणे शक्य नसते, त्यांनी खोटे दागिने अर्पण करून आपला नवस फेडला.

विठ्ठलाच्या चरणी आलेल्या दानाची पुजाऱ्यांनी मोजदाद केली तेव्हा आतापर्यंत तब्बल 31 किलो सोने, 1050 किलो चांदी जमा झाल्याचे समोर आले आहे.

सोन्याच्या विटा करणार

विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले आहे. सध्या या सावळ्याच्या खजिन्यात तब्बल 31 किलो सोने आणि 1050 किलो चांदी जमा झाली आहे. या दागिन्यातून सोन्याच्या विटा तयार करण्यात येणार आहेत. विठ्ठलाच्याच्या चरणी दरवर्षी जवळपास 3 किलो सोने आणि 200 किलो चांदी भाविक अर्पण करतात.

तब्बल 1 कोटीचे दान

दोन वर्षांपूर्वी एका महिला वारकऱ्याने विठ्ठलाच्या चरणी तब्बल 1 कोटीचे दान अर्पण केले आहे. त्यांच्या पतीची अंतिम इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आपल्या विम्याची रक्कम विठ्ठलचरणी अर्पण करणास सांगितले होते. पतीच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने ही रक्कम विठ्ठल मंदिराकडे दिली. विशेष म्हणजे त्यांनी आपले नाव गुप्त ठेवले आहे.

असाही नवस फेडला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाकडे पाहिले जाते. त्याच्या धरणी राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक येऊन लीन होतात. अनेकांनी विठ्ठलाला काही साकडे घातलेले असते. तर कोणी नवस केलेला असतो. मात्र, प्रत्येकाला हवे ते दान इथल्या पेटीत टाकणे शक्य नसते. ज्याच्याकडे भरपूर पैसाआडका असतो, तो सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करतो. मात्र, ज्यांची आर्थिक परिस्थिती तंगीतली असते, ते लोक खोटे दागिने अर्पण करून आपला नवस फेडतात. दर महिन्याला ही दानपेटी उघडली जाते.

काही जणांची फसवणूक...

मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, विठ्ठल मंदिराचे सराफांनी दागिन्यांची तपासणी केली. अनेकांनी पैसे, कोणी सोने-चांदीचे दागिने विठ्ठलाचरणी अर्पण केले. तर काही भाविकांनी खोटे दागिनेही दानपेटीत टाकले. यातल्या काही जणांनी परिस्थिती अभावी हे दागिने टाकले असतील, तर अनेकांची सराफांनीही फसवणूक केलेली असू शकते.

बातम्या आणखी आहेत...