आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांचा संताप:समांतर जलवाहिनी; लवादाचा आदेश नाही, काम का थांबवले

चंद्रकांत मिराखोर |सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समांतर जलवाहिनीचे काम प्रशासनाने थांबवल्याने लाेकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. शहरास वेठीस धरणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीतील चेअरमनसह सर्वांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी तर सरकार बदलले की काम कसे थांबते ॽ स्मार्ट सिटीचे काम थांबवून शहरास वेठीस धरण्याचा प्रयत्न असल्याचा आराेप आमदार प्रणिती शिंदे यांनी करीत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार, असा इशारा दिला. शहर पाणीपुरवठ्यासाठी उजनी ते साेलापूर समांतर जलवाहिनीचे सुरू असलेले काम स्मार्ट सिटी कंपनीने थांबवले.

या संदर्भात शहरातील तिन्ही लाेकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया ‘दिव्य मराठी’ ने जाणून घेतल्या. आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, केवळ मागील मक्तेदार लवादाकडे अपिलात असल्याचे सांगत प्रशासनाने मनमानीपणे साेलापूरकरांची तहान वाढवली. शहरात पाणीटंचाई असताना समांतर जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटी कंपनीने परस्पर कसे थांबवले. याबाबत राज्यातील वरिष्ठांकडे पाठपुरावा करू. आमदार सुभाष देशमुख यांनी दुहेरी कामाबाबत माहिती घेतो, असे सांगत सावध भूमिका घेतली.

जलवाहिनीचे टेंडर बदलण्यामागे आर्थिक व्यवहाराचा संशय
स्मार्ट सिटी कामाच्या दर्जाबाबत दोन वर्षापासून सीईओ त्रिंबक ढेंगळे-पाटील तसेच राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. निकृष्ट कामे केली. कामाची प्रतवारी तपासण्याची मागणी केली. परंतु कसलीच चौकशी झाली नाही. समांतर जलवाहिनीचे टेंडर वारंवार काढून काम बदलून आर्थिक व्यवहार असल्याचा संशय येतो. यापूर्वी पोचमपाड कंपनीने काम केले नाही, त्यांच्यावर कारवाई नाही.

रोज पाणी देण्याचा प्रयत्नाला खो घालण्याचा जाणून बुजून अधिकाऱ्यांमार्फत प्रयत्न आहे. यापूर्वी रस्ते मक्तेदारास ९२ कोटी देणे असताना १०५ काेटी कसे दिले. असिम गुप्ता हे पूर्वीपासून चेअरमन, पण तक्रारीनंतर एवढे दिवस गप्प का बसले ॽ- विजयकुमार देशमुख, आमदार

शहरवासीयांचा अंत पाहू नका, विधानसभेत आवाज उठवणार
समांतर जलवाहिनी करून शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवा. शहरास रोज पाणीपुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनी झाली पाहिजे. मक्ता रद्द करणे योग्य नाही. पूर्वीचा मक्तेदार न्यायालयात गेला, लवाद नेमला पण काम थांबवण्यासाठी कोणताही शासकीय व न्यायालयीन आदेश नसताना स्मार्ट सिटी कंपनीने परस्पर कारभार केला.

याप्रकरणी संबंधितांची चौकशी करा. समांतर जलवाहिनीचा प्रश्न तत्काळ सोडवा. पाण्यावरून शहरास वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे शासनातील वरिष्ठांकडे तक्रार करू, तसेच विधानसभेत संधी मिळाल्यास आवाज उठवू. या प्रकरणी स्मार्ट सिटीची चेअरमन असीम गुप्ता, सीइओ शितल तेली-उगले यांना पत्र दिले आहे. -प्रणिती शिंदे, आमदार

माहिती घेऊन सांगतो : सुभाष देशमुख
समांतर जलवाहिनीचे काम झाले पाहिजे. काम थांबवले असेल तर याबाबत मी माहिती घेऊन सांगतो, असे आमदार सुभाष देशमुख म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...