आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळे सील:पार्क स्टेडियम: 7 दिवसांत भाडे द्या अन्यथा गाळे सील

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या पार्क स्टेडियम येथील ५९ गाळ्यांची भाडे कराराची मुदत २०१७ साली संपली आहे. त्यानंतर गाळ्यांची भाडे वाढ करण्यात आल्याने तेथील व्यापारी दिवाणी न्यायालयात गेले. तेथे महापालिकेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर जिल्हा न्यायालयात अपिल केले. तेथे सुनावणी सुरू आहे परंतु भाडेवसुलीस स्थगिती नाही. त्यामुळे महापालिका भूमी व मालमत्ता विभागाने ५९ गाळेधारकांना नोटीस काढत सात दिवसांत पैसे भरण्याचे आदेश दिले अाहेत, अन्यथा गाळे सील करण्याचे म्हटले आहे. थकीत भाड्याची रक्कम सुमारे चार कोटी रुपये इतकी आहे.

पार्क स्टेडियम येथे रस्त्याच्या बाजूस ५९ गाळे आहेत. या गाळ्यांच्या भाडे कराराची मुदत २०१७ साली संपली. त्यानंतर गाळेधारकांना भाडे वाढीची नोटीस दिली. याच काळात गाळे मालकीवरून स्टेडियम कमिटी व महापालिका यांच्यात वाद निर्माण झाला. दरम्यान, व्यापाऱ्यांनी या प्रकरणी दिवाणी न्यायालयात दाद मागितली. तेथे व्यापाऱ्यांचे अपिल फेटाळण्यात आले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी जिल्हा न्यायालयात अपिल केले आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे परंतु न्यायालयाने गाळे भाडे वसुलीस कोणतीही स्थगिती नाही. त्यामुळे महापालिकेने ५९ गाळेधारकांना शुक्रवारी नोटीस जारी केली आहे. तसेच सात दिवसांत थकीत भाडे भरण्याचे आदेश काढण्यात आले.

सिकची धर्मशाळा गाळ्यांचा प्रश्न प्रलंबित
रेल्वे स्टेशनसमोर असलेली महापालिकेच्या ताब्यातील सिकची धर्मशाळेसमोर व्यापारी गाळे असून, तेथील गाळ्यांचा भाडेवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिका भूमी व मालमत्ता विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. पालिका आयुक्त व महापौर बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या व्यापारी गाळ्यांची भाडेवाढ पालिकेने केली नाही. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

थकित भाडे न भरणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई
सन २०२१-२२ मध्ये पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्याचे शून्य भाडे भरणाऱ्या गाळेधारकांवर महापालिका भूमी व मालमत्ता विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. असे गाळे सील करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांनी दिली.

५९ जणांना गाळेभाडे भरण्यासाठी नोटीस बजावली

पार्क स्टेडियम येथील ५९ गाळ्यांचे भाडे मागणी करणारी नोटीस तेथील गाळेधारकांना काढली असून, सात दिवसांत भाडे भरा अन्यथा सील करण्यात येईल. तेथील व्यापारी सात दिवसांत भाडे भरतील अशी आशा आहे.'' विक्रम पाटील, महापालिका सहायक आयुक्त

बातम्या आणखी आहेत...