आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बंद पोलिस चौकीत पार्किंग, पालापाचोळा; नागरिकांची गैरसोय

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वच पोलिस चौक्या बंद केल्यामुळे त्या त्या परिसरातील नागरिकांची गैरसोय वाढली आहे. तसेच चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग आदी प्रकार वाढत आहेत. या बंद चौक्या पार्किंग, भिक्षेकरींचे आश्रयस्थान बनल्या आहेत. कुठे पालापोचाळ्याचे ढीग साचले आहेत.

शहरात एकूण सात पोलिस ठाणी असून त्यांच्या अंतर्गत ३२ पोलिस चौक्या आहेत. पोलिस आयुक्त असताना अंकुश शिंदे यांनी दीड वर्षांपूर्वी पोलिस चौक्या बंद केल्या. तेथील कामकाज पोलिस ठाण्यांमधून चालू केले. त्यामुळे पोलिस चौक्या ओस पडल्या. तक्रारदार किंवा नागरिकांची होणारी गर्दी पोलिस ठाण्यांकडे वळली. एक दिवसही जात नाही ज्या दिवशी चोरी झाली नाही. दादागिरी, गुंडगिरीचे प्रकार वाढले आहेत.

रेल्वे स्टेशन बाहेरील पोलिस चौकीच्या आवारात अनेकजण दुचाकी पार्किंग करीत आहेत. तरटी नाका पोलिस चौकीच्या आवारात पालापाचोळा पडला असून बाथरुमचा आणि पिण्याच्या पाण्याच्या नळाचा वापर बाहेरचे लोक करत आहेत. नवी वेस पोलिस चौकीच्या समोर ठेवलेल्या बाकड्यांवर सायंकाळी अनेकजण बसत आहेत आणि दुचाकी पार्किंग करीत आहेत. मार्केट पोलिस चौकीच्या आवारात भिक्षेकरी बसत आहेत. अशीच परिस्थितीत शहरातील सर्व पोलिस चौक्यांची असल्याचे बोलले जात आहे.

अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हावे
कायदा व सुवस्था टिकवायची असेल तर जागेवर सुविधा देणे गरजेचे आहे. इतर देशात एसएमएसवरून फिर्याद नोंद होते. अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हावे. चौक्या सुरू व्हाव्याच, इतकेच नाही तर आवश्यक ठिकाणी नव्या चौक्यासुध्दा सुरू व्हाव्यात.’’
एम. एच. शेख, सामाजिक कार्यकर्ते

अभ्यासनंतर निर्णय घेण्यात येईल
तत्कालिन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पाेलिस चाैक्या का बंद केल्या त्याचा मी अभ्यास करत आहे. लवकरच यातून योग्य ताे निर्णय घेऊ.’’
सुधीर हिरेमठ, पोलिस आयुक्त

पोलिस चौक्या सुरू पाहिजेत
नागरिकांच्या सोयीचा उद्देश ठेवून पोलिस चौक्या निर्माण करण्यात आल्या. त्या त्या परिसरातील नागरिकांशी संवाद साधता यायला हवा. चौकी जवळ असेल तर नागरिक स्वत:ला सुरक्षित समजतात. पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देत असताना त्यांच्यावर कामाचा ताण येतो आणि तक्रार दाखल करून घेण्यासाठी विलंब होतो. पोलिस चौक्या सुरू व्हायलाच हवे.’’
अॅड. सरोजिनी तमशेट्टी

बातम्या आणखी आहेत...