आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीर्ण वसाहतीचा काही भाग गुरुवारी कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ५० वर्षांपेक्षा जुनी असलेल्या या इमारतीतील ११० कुटुंबांचे जीवन धोक्यात आले आहे. बुधवार पेठेतील ही कर्मचारी वसाहत धोकादायक स्थितीत आहे. यापूर्वी २५ ते ३० टक्के भाग कोसळला आहे. गुरुवारी दुसऱ्या मजल्याचा जीना व सुरक्षा भिंत कोसळली.
शहरातील इतर धोकादायक इमारती पाडण्यासाठी प्रशासन नोटिसा देत असते. स्वमालकीचीच इमारत धोकादायक असताना काहीच कार्यवाही केलेली नाही. तेथील कुटुंबांना पर्यायी जागा न देता घरे रिकामी करण्यास सांगितले. ते कर्मचाऱ्यांना मान्य नाही. त्यामुळे पेच वाढला आहे. घटना समजल्यानंतर महापालिका झोन अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी पाहणी केली. सफाई कर्मचाऱ्यांना पर्यायी घरकुल देण्याची मागणी करत माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, कर्मचारी संघटनेचे बाली मंडेपू, नागनाथ गदवालकर आदींनी आयुक्तांची भेट घेतली.
वसाहतीत स्वच्छता नाही
शहराची सफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत अस्वच्छता आहे. पाण्याचे डबके, इमारतीवर झाडे उगवली आहेत. ड्रेनेज चेंबर धोकादायक स्थितीत आहे. इमारतीस शेवाळ पकडले आहे. छतावर पाणी साचल्याने साथीचा आजार पसरण्याची शक्यता आहे.
पण प्रश्न सुटला नाही
सफाई कर्मचाऱ्यांची वसाहत धोकादायक असल्याने तेथे अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले पण प्रश्न कायम आहे. लोकप्रतिनिधीत आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक, नगरसेविका, पालिकेचे माजी आयुक्त सौरभ राव, रणजितसिंह देओल, विजयकुमार काळम पाटील आदींचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.