आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी कामगारांना किमान वेतन द्या:त्वरीत त्रिपक्षीय समिती गठीत करा; राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक वर्षांपासून विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी दिली जात नाही, सोलापूर शहरात 60 ते 70 हजार विडी कामगार आहेत, तसेच महाराष्ट्र राज्यात 5 ते 6 लाख विडी कामगार आहेत. या कामगारांचे विडी कामावर त्यांचे रोजीरोटी अवलंबून आहे. ते कुठल्याही रोगराईला न घाबरता त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते विडी वळण्याचे काम करुन त्यांची कुटुंबे सांभाळतात. अशा विडी कामगारांची महाराष्ट्र शासन दखल घेताना दिसत नाही. अनेक वर्षांपासून विडी कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कामगार सेलच्या वतीने शासन दरबारी प्रयत्न करीत आहोत. परंतु आजपर्यंत शासनाने त्याची दखल घेतली नाही.

वास्तविक पाहाता गेल्या वर्षी तत्कालिन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना विनंती केली असता, त्यांनी उप सचिवांना पत्र पाठवून त्रिपक्षीय समिती गठीत करण्यास सांगितले होते. परंतु शासन बरखास्त झाले, त्यानंतर आपले पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु आजपर्यंत विडी कामगारांचा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून विडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे मजुरी देण्यासाठी फक्त कागदोपत्री जी.आर. निघतो परंतु कामगारांना त्याप्रमाणे मजुरी मिळत नाही. एकीकडे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, त्यात विडी कामगार हे तुटपुंज्या मजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह करीत आहेत.

विडी कामगारांना दर हजार विड्यांमागे 350/- रुपये मजुरी मिळवून देण्यात यावी किंवा हा प्रश्न त्वरीत निकाली होण्यासाठी त्वरीत त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात यावी. जेणेकरून विडी कामगारांना अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेला किमान वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल, अशा आशयाचे निवेदन मा.मुख्यमंत्र्यांना अशोक चौक संपर्क कार्यालयातून ई-मेलद्वारे दि. 23/11/2022 रोजी पाठविण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू, अंबिका गादास, शारदा मुंडेटी, सतिश दासरी, सोमनाथ कनकी, बालाजी बुधारम, दामोदर येलदी, अंबादास देविदास, तिम्माया मादगुडी, सतिश गोरंटला, विष्णू गुडेटी. आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...