आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:बदलत्या काळानुसार अन्न, वस्त्र, निवारासह मनोरंजनही लोकांना हवे; चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांचे प्रतिपादन

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या काळानुसार अन्न, वस्त्र, निवारासोबत आता लोकांना मनोरंजनही हवे. त्यासाठी मनोरंजन क्षेत्रात करिअर करायची तरुणाईला चांगली संधी असल्याचे प्रख्यात अभिनेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश यांनी येथे सांगितले. तुळजापूर रोडवरील तळेहिप्परगा येथे अॅक्वापार्क प्रायव्हेट लिमिटेड संचलित शॉवर अॅण्ड टॉवर वॉटर पार्कची उभारणी करण्यात आली असून त्याचे उद‌‌्घाटन सोमवारी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, चाकोते कुटुंबीयांनी वॉटर पार्कच्या स्वरूपात अनोख्या विश्वाची निर्मिती केली आहे. कोरोनामुळे दोन ते अडीच वर्षे घरात बसून लोक हैराण झाले आहेत. मनोरंजनासाठी लोक मेट्रो सिटीत जातात. मात्र, असे वॉटर पार्क जर उभे झाले तर मेट्रो सिटीत जाण्याची गरज पडणार नाही. चाकोते कुटुंबीयांनी या वॉटर पार्कच्या विविध ठिकाणी शाखा सुरू कराव्यात. या व्यवसायातून आदर्श घेऊन तरुणांनी विविध उद्योग उभे करावेत. एसबीआय बँकेने जसे चाकोते कुटुंबीयांना मदत केली आहे तशी इतरांनाही करील. अडचणीच्यावेळी बॅँकेने तरुणांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असा सल्ला श्री. देशमुख यांनी दिला.

यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी प्रस्तावना केली. यामध्ये त्यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, भारतीय स्टेट बॅँकेचे पुणे विभागीय व्यवस्थापक महेश्वर प्रसाद, बार्शी शिवसेनेचे प्रमुख आंधळकर, वळसंग सूत मिलचे राजशेखर शिवदारे, माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, सुप्रिता चाकोते, सुदीप चाकोते, विश्वशंकर चाकोते, विश्वराज चाकोते, सकलेश चाकोते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले. आभार विश्वराज चाकोते यांनी मानले.

सोलापूरसोबत आमचे आपुलकीचे नाते
सोलापूरशी खूप वेगळे नाते आहे. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीमुळे आम्ही वारंवार सोलापूरला येत होतो. तसेच लातूर ते मुंबई रेल्वे प्रवास करायचा असेल तेव्हा व्हाया सोलापूरच जात असो. सोलापूरला आल्यावर चाकोते कुटुंबीयांकडून आम्हाला जेवणाचा डबा यायचा. अनेक कारणांमुळे सोलापूरसोबत आमचे आपुलकीचे नाते बनले आहे, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

अन् फोटो काढण्यासाठी गर्दी
चित्रपट अभिनेते रितेश देशमुख जेव्हा व्यासपीठावर विराजमान होते तेव्हा अनेकांनी त्यांची ऑटोग्राफ घेतला. कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित तरुणाईने त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्याची आणि सेल्फीची हौस पूर्ण केली.

बातम्या आणखी आहेत...