आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दिलासा:‘विठ्ठल’ची राज्य सहकारी बँकेच्या ताब्यातील साखर विकण्यास परवानगी; सहकार विभागाचा आदेश, 22 कोटी 73 लाख उपलब्ध होणार

पंढरपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेली साखर विकून शेतकऱ्यांना थकीत ऊसबिलाची रक्कम देण्याचा आदेश सहकार विभागाच्या उपसचिवांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी सुमारे २२ कोटी ७३ लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. तर सहकार विभागाच्या या आदेशाने गेल्या दीड वर्षापासून लाखो रुपये अडकून पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या २०२०-२१ या वर्षातील गाळप हंगामातील एफआरपीचे ३९ कोटी ७६ लाख ३३ हजार रुपये थकीत आहेत. तर कारखान्याच्या गोदामात १ लाख ९ हजार ९७३ क्विंटल साखर विक्रीअभावी पडून आहे. ही साखर विकून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आरआरसी कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले होते. त्यानुसार त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती.

दरम्यान राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर असलेल्या थकीत कर्जापोटी ही साखर जप्त केली होती. मात्र, ही साखर विकली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ही साखर विकून ऊस उत्पादकांचे पैसे देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सहकार विभागाचे उपसचिव अं. पां. शिंगाडे यांनी राज्य सहकारी बँक आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...