आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Plan Ahead For The Expected Crowds; Notice To The Officers In The Review Meeting Of The District Collector, Preparations For The July Wari Begin | Marathi News

दिव्य मराठी विशेष:आषाढीत गर्दीची शक्यता लक्षात घेत नियोजन करा; जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना, जुलैतील वारीसाठी तयारी सुरू

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे पंढरपुरात आषाढी वारी मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत साजरी झाली होती. यंदा सरकारने निर्बंध हटवल्याने १० जुलैला आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. ही वारी निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून आवश्यक नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शुक्रवारी येथे केली.

वारीच्या पूर्व नियोजनाबाबत बैठक झाली. श्री. शंभरकर यांनी नियोजनाविषयी सांगितले. वारीत सुमारे दहा ते बारा लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यांना प्रशासनाकडून आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा तसेच सुरक्षा दिली जाते. राष्ट्रीय महामार्ग कामांमुळे पालखी तळ, पालखी विसावा जागा अपुऱ्या पडत असतील तर जागेची तत्काळ पर्यायी व्यवस्था करून वारकरी भाविकांना जागेबाबत अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यात्रा कालावधीत व वारकरी व भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित विभागाला दिलेली जबाबदारी पार पाडावी. यासाठी जिल्हा परिषद विभागाने पालखी मार्गावर व पालखीतळावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व तात्पुरते शौचालय, पालखी मार्ग व पालखी तळावरील अतिक्रमणे काढणे. पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था याबाबत नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडुजी, काटेरी झाडेझुडपे काढावीत. पालखी तळावर पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, स्वप्नील रावडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

औषधसाठा, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था करावी
आषाढी वारी काळात मुबलक प्रमाणात औषधाचा साठा तयार ठेवावा, तज्ज्ञ डॉक्टरांसह फिरते आरोग्य पथक उपलब्ध ठेवावे, पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. पंढरपूर नगरपालिकेने तात्पुरते शौचालय व्यवस्था स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. शहरातील अतिक्रमणे काढावीत. पोलिस प्रशासन आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेबरोबरच वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या.