आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वात महत्त्वाचा पोलिसांचा फिटनेस आहे. त्यासाठी नियमित परेड घेणे. मुख्य काम गुन्हेगारी रोखणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि सामान्य नागरिकांची कामे झालीच पाहिजेत, या मताचा मी आहे. याच कामांना प्राधान्य राहील, असे प्रभारी नूतन पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाहतूक सुधारण्यासाठी अभ्यास करतो. मागील चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी या घटनांचा तपास कशा पद्धतीने मार्गी लावता येईल याबाबत गुन्हे शाखा, सातही पोलिस ठाण्याचे डीबी पथक, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी संवाद साधून तो सोडवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. वाहतूक शाखेने कारवाई करावी हा उद्देश नाही. जनतेने नियम पाळावेत. याशिवाय वाढते सायबर क्राइम याबाबत सायबर क्राइम कक्ष सक्षमपणे करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील, असे श्री. हिरेमठ म्हणाले. याप्रसंगी पोलिस उपायुक्त बापू बांगर, पोलिस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर उपस्थित होते.
श्री. हिरेमठ हे मूळचे सोलापूरचे
श्री. हिरेमठ हे मूळचे सोलापूर शहरातील आहेत. त्यांचे वडील बांधकाम खात्यात अधिकारी होते. विजापूर रोड सैफुल येथे त्यांचे निवासस्थान आहे. याशिवाय दहावीपर्यंतचे शिक्षण सम्राट चौकातील श्राविका शाळेत, सातवी ते दहावी शिक्षण पंढरपूर येथे, अकरावी, बारावी दयानंद महाविद्यालयात झाले आहे. त्यानंतर ते पुणे आणि दिल्ली येथे शिक्षणासाठी गेले. २००७ साली केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी परीक्षा - थेट आयपीएस ) उत्तीर्ण झाले. त्यानंतर भंडारा, अकोला, गडचिरोली, वाशीम, मुंबई, पुणे या ठिकाणी विविध पदांवर आतापर्यंत काम केले आहे. त्यांना मागील वर्षी उपमहानिरीक्षक या पदावर बढती मिळाली आहे. ते मुळचे सोलापूरचे असल्यामुळे कामाचा एक वेगळा ठसा उमटवतील असे एकूण त्यांच्या बोलण्यातून, कामाच्या पद्धतीवरून दिसून येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.