आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पोलिस मदत केंद्र नावालाच, प्रवासी सुरक्षा रामभरोसे; मदत केंद्रावरून मदत मिळत नसल्याची तक्रार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर एसटी स्थानकात प्रवाशांची सुरक्षा आणि मदतीकरिता पाेलिस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र हे पोलिस केंद्र दिवसभर रिकामेच असल्याचे पाहायला मिळते. पेट्रोलिंगच्या नावाखाली इथे तैनात असलेले कॉन्स्टेबल किंवा होमगार्ड मंडळी ही बऱ्याचदा गडप असल्याच्या तक्रारी प्रवासी करताना दिसतात. त्यामुळे हे मदत केंद्र नावालाच असून, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे.

पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या माहितीनुसार गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये एसटी आगारात पाच ते सहा गुन्हे घडले आहेत. या सगळ्या गुन्ह्यांचा आढावा घेता बॅगा काढून पिशव्या पळवून गडप करून चोरी करणाऱ्या चोरांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर येते. पण त्यातील अनेक प्रकरणात आरोपी किंवा मुद्देमाल हाती आला असल्याची माहिती मात्र पुढे येत नाही. मध्यंतरी एका महिलेला पोलिसांची मदत हवी होती. दुपारच्या सुमारास त्यांनी पोलिस मदत केंद्राकडे धाव घेतली. पण तेथे कुणी नव्हते. दरम्यान कंट्रोलला असलेल्या सहकाऱ्यांनी थांबा मी अनाउन्समेंट करतो असे म्हणून थोडा वेळ घालवला, मात्र त्यांची सिस्टीम अपडेट झाली नाही तेव्हा त्या सहकाऱ्यांनी नंतर अनाउन्समेंट केली. मात्र तरीही पोलिस कर्मचारी तिथे हजर राहिले नाहीत.

पोलिस केंद्रावर मदत मिळायला हवी
एसटी स्थानकात पोलिस मदत केंद्र म्हणून बोर्ड लावला आहे तिथे मदत करण्यासाठी व्यक्ती हवी. एखाद्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अचानक कोणी हिसकावले तर त्या क्षणी त्या महिलेला काय करावे हे कळणार नाही. पण पोलिस असतील तर तो धाक असू शकतो किंवा नुसती खाकी वर्दी पाहिली तरी लोकांना भीती वाटते, तो धाक ती वचक असायला हवी. याकरिता तिथे कायम एक पोलिस कर्मचारी तैनात असला पाहिजे.'' अनिकेत जानराव, प्रवासी

पोलिस असायला हवेत
एसटी स्थानकाजवळ चोऱ्या होत असतील तर येथे पोलिस असायलाच हवेत. पण पाेलिस केंद्रात कुणीच नसते. अनेक वेळा मदत मागण्यासाठी गेलो. पण कोणतीही मदत मिळाली नाही. पोलिस मदत केंद्र प्रवाशांचा सुरक्षेसाठी असते. विशेषत: महिला प्रवाशांना तर मदत मिळालीच पाहिजे. मदत मिळणार नसेल तर अशी केंद्रे का उभारता?''
लता कुंदूर, प्रवासी

बातम्या आणखी आहेत...